मुंबईः उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारणार असल्याचे वक्तव्य केल्यापासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान, योगी दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर तर, या चर्चेला आणखीनच उधाण आले होते. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून शाब्दिक द्वंद्व सुरु होते. काही झाले तरी बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा महाविकास आघाडीचे नेते देत होते. मात्र, योगींनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फुगा फोडला. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरची फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
योगी म्हणाले, ‘आम्ही इथे काहीही घेऊन जायला आलेलो तर काहीतरी नवीन तयार करण्यासाठी आलो आहे. ही खुली स्पर्धा आहे. समाजाला चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकानं दिले पाहीजे. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील फिल्मसिटी त्यांचं काम करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
योगी म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये एक जागतिक स्तरावरची फिल्मसिटी उभी करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांशी चर्चाही झाली आहे. ते सुद्धा फिल्मसिटीसाठी उत्सुक आहेत. या प्रस्तावित फिल्मसिटी साठी नोएडा येथे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फिल्मसिटीची ही जागा जेवर विमानतळाजवळ आहे. ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील,’ असे त्यांनी सांगितले.