पुणे(प्रतिनिधि)–“आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसा आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या सभेत व्यापाऱ्यांना उद्देशून केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेची जागा मिळवण्यासाठी मतदारसंघात सभां, मेळाव्यांचा धडाका लावला आहे. आपल्या सभा, बैठका, मेळाव्यांतून अजित पवार तळगाळातील प्रत्येकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांनी आज इंदापुरात डॉक्टर, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.
देशामध्ये विकास करण्यासाठी पैसा लागतो. महाराष्ट्रातल्या टॅक्स माझ्या हातात आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तुम्ही पण पाळा. केंद्राचे बजेट झाल्याशिवाय राज्याचे बजेट करता येत नाही. यातून व्यापाऱ्यांना आणि सर्वांनाच फायदा होईल, मात्र फायदा कोणामुळे झाला हे विसरू नका. मला आदेश द्यायला आवडतो, मी अधिकाऱ्यांनाही आदेश देतो, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनाही आदेश देतो. आता मात्र हा कार्यकर्ता आहे याला सांभाळा, असे सांगावे लागते”, असे अजित पवार मिश्लिकपणे म्हणाले आहेत.
“काही जण भावनिक मुद्दे आणतील, मात्र भावनिकतेने आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या खासदाराने आतापर्यंत कुठलं विकासकामं आणलं ते सांगा,” असा टोला त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला आहे.