पुणे- राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महिला, युवती आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विनयभंग, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि खुनांच्या घटना घडत आहेत. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर सरकारला झोपू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. उद्धव ठाकरे जागे व्हा, सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे आणि संवेदना शून्य झाला आहात, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर यावेळी निशाणा साधला.
पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला अत्याचाराविरोधात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखालील ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, माजी मंत्री अनिल बोंडे, आमदार मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माजी मंंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक येनपुरे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले, ‘हाथरसची घटना क्लेशदायकच आहे, पण महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अन्याचाराबाबत सरकारने डोळे झाकले आहेत. सरकार महाराष्ट्राला लुटायला बसले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत असंवेदनशील आहे. महिलांवरील गुन्ह्याच्या तपासाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली, मग राज्य सरकार कायदा करण्यात मागे का आहे.’
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ’मु‘यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. गृहमंत्री ङ्गोटो सेशनमध्ये व्यस्त आहेत. महिलांवर न्याय द्यायला सरकारला वेळ नाही. खरं तर सरकार स्थापन करण्याचा कौल भाजपला होता. परंतु शिवसेनेने गद्दारी केली. हे तत्वहीन सरकार आहे. सरकारला बदल्या करण्यात स्वारस्य आहे. परंतु महिलांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नाही. या सरकारच्या विरोधात आज शहरात आठ ठिकाणी आंदोलन करण्यात आले.’
खासदार बापट म्हणाले, ‘महिलांवर होणार्या अत्याचाराचे सरकार राजकारण करीत आहे. महाराष्ट्रात अत्याचार झालेल्या महिलांना भेटायला मंत्र्यांना वेळ नाही. केवळ विरोधी पक्षनेते आणि भाजपचे पदाधिकारी भेटी देऊन धीर देत आहेत. या झोपलेल्या सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आंदोलन तीव‘ करावे लागणार आहे.’
महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे म्हणाल्या, ‘हाथरस येथील घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. परंतु महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचाराविरोधात त्या बोलत नाही. राज्यात महिलांना सुरक्षितता देता येत नसेल तर सरकारने खुर्ची खाली करावी.’