पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाची असणारी अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळ निवडणूक जानेवारी महिन्यात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी विद्यापरिषदेवर प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ व अखिल भारतीय प्राचार्य महासंघ यांनी विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने एकत्रितपणे निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी काही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. विद्यापरिषदेवर प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांसह प्रा. डॉ.कैलास कापडणीस, प्रा.डॉ.पराग काळकर, प्रा.डॉ.वीना नारे, प्रा.डॉ.तुकाराम रोंगटे, प्रा.डॉ.राजश्री जायभाये, प्रा.डी.मोहन कांबळे यांची निवड झाली. या बिनविरोध निवडीकरिता राजेश पांडे, डॉ.गजानन एकबोटे, नंदकुमार झावरे, प्रा.डॉ.एस.पी.लबांडे, प्रा.डॉ.के.एल.गिरमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर हे पुण्यातील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य म्हणून कार्यरत होते. याशिवाय राज्यातील प्राचार्यांच्या हक्क आणि मागण्यांकरीता अनेक वर्षे सातत्याने कार्यरत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रिन्सिपल फोरम, सी.वाय.डी.पी.शिक्षण व क्रीडा मंडळ, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, जय गणेश एज्युकेशनल फाऊंडेशन, आदित्य एज्युकेशनल फाऊंडेशन आदी संस्थांवर ते कार्यरत आहेत. कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते समाजातील गरजू घटकांकरीता देखील सातत्याने कार्य करीत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरीता देखील वेगवेगळे उपक्रम राबवित असतात.