पुणे-पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, माजी मंत्री रमेश बागवे, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांचा कंठ दाटून आला
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चंद्रकांत पाटील यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, आमदार मुक्ता टिळक यांनी सुरुवातीच्या काळात नगरसेवक म्हणून काम केले. नगरसेवक असतांना सभागृह नेता,स्थायी समितीवरही काम केले. पुणे महानगर पालिकेत २०१७ मध्ये त्यांनी पुणे शहराच्या महापौर पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. लोकमान्य टिळकांचा विचार त्या स्वतः जगत होत्या. सामाजिक कार्यात योगदान देताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी संघर्षही केला. संघटनेचा आदेश कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका कशी पार पाडावी हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी मुक्ताताईनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. टिळक कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, असे ते म्हणाले.
दरम्यान, केसरीवाडा येथील निवासस्थानी मुक्ता टिळक यांचे पार्थिव आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अंत्यदर्शनाकरीता ठेवण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दर्शन घेतले. त्यानंतर केसरीवाडा ते नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकीय पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व- देवेंद्र फडणवीस
आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप दुःखाचा आहे. मुक्ता टिळक या आमच्या सहकारी होत्या. त्या कसबा मतदार संघाचे आमदार होत्या. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर तसेच आमदार म्हणून जनसामान्यांशी त्यांचे एक कनेक्ट होता आणि शेवटी टिळक घराण्याचा जो वारसा आहे तो वारसा अतिशय समर्थपने त्या निभावत होत्या. मला असे वाटते की गेली 30 वर्ष मुक्ता टिळक या भारतीय जनता पक्षाच्या अतिशय एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून सामान्य कार्यकर्ते पासून ते वेगवेगळ्या पदांपर्यंत त्या पोहोचल्या त्या स्वतःच्या मेहनतीने आणि लोकांशी असलेल्या संपर्काने त्या ते पदापर्यंत पोहचल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्या कल्पक होत्या त्या चांगल्या वक्त्या होत्या आणि एकूणच जे त्यांची वाटचाल होती ती बघितल्यानंतर कधीच असे वाटले नाही की अशा अर्ध्या वाटेत ते आम्हाला सगळ्यांना सोडून जातील. मला आठवते की राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांची तब्येत अतिशय खराब असताना देखील मतदान करायला ते आल्या. मी तर विधान परिषदेच्या वेळी त्यांना सांगितले की एखादी जागा निवडून आली किंवा आपण हरलो यापेक्षा तुमचा जीव मोठा आहे. त्यामुळे तुम्ही येऊ नका कारण तुमची स्थिती काही एवढा प्रवास करून या ठिकाणी येण्याची नाही. पण तरी त्यांनी त्यांच्या घरच्यांकडे हट्ट धरला की पक्षाला आवश्यकता आहे म्हणून मी येणार आणि मतदान करणार आणि येऊन त्यांनी मतदान केले. त्यामुळे मला असे वाटते की अशा प्रकारचे समर्पित एक नेतृत्व एक कार्यकर्ता निघून जाणे पक्षाची आणि ती समाजाची देखील मोठी हानी आहे. ही हानी न भरून निघण्यासारखी नाही. मी देखील त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.