हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक – कालीचरण महाराज

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे(प्रतिनिधि) – दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे परखड मत कालीचरण महाराज यांनी केले.

धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी धर्मजागरण सभेचे आयोजक शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे, पुणे शहर भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला आदी यावेळी उपस्थित होते.

देशात काही ठिकाणी विशिष्ट समुदायातल्या युवकांवर जमावाने हिंसेच्या घटना घडत आहेत. अशा घटनांबद्दल मनात कोणतीही खंत नाही. हिंदू धर्माचे कार्यच दुष्टांचे निर्दालन करणे हे आहे. त्यामुळे अशा हिंसेचे मी उघड समर्थनच करतो, अशा शब्दांत कालीचरण महाराजांनी मॉब लिंचिगला पाठिंबा दिला.

या धर्मजागरण सभेचा उद्देश जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदू समाजाची मोट बांधून कट्टर हिंदू व्होटबँक बनविणे हा आहे. अशी व्होट बँक बनविणे हेच साधूंचे कार्य आहे. समाजाचे हित साधणारा तो साधू या न्यायाने मी माझे कार्य करीत आहे, असेही कालीचरण महाराज यांनी सांगितले.

हिंदू मुलींनी इतर धर्मीयांशी केलेल्या विवाहाचे परिणाम आपण बघतोच आहोत. लव्ह जिहादच्या दररोज देशभरात चाळीस हजार घटना होत आहेत. याला आळा घालण्यासाठीही हिंदूंनी संघटीत होणे गरजेचे आहे. मुस्लिम समाज संख्येने कमी असतो तोवर भाईचारा असल्याचे दिसते. मात्र, त्यांची संख्या वाढल्यावर ते त्याच भाईला आपला चारा बनवतात, असेही कालीचरण महाराज यांनी सांगितले.

धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशिकेत नव्हता. तो शब्द इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्तीद्वारे घुसवला आहे. त्यामुळे अशा बेगडी धर्मनिरपेक्षतेला काहीच अर्थ नाही. योगी आदित्यनाथ यांची प्रभू श्रीरामाशी तुलना करताना, कालीचरण महाराज म्हणाले, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ अतिशय प्रभावी काम करत असून देशभरातल्या समस्त हिंदूंच्या संघटनाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता त्यांच्या अंगी आहे. भविष्यात हिंदुस्थानात रामराज्य आणण्याचे स्वप्न ते साकार करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.             

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *