जात आणि समाज : समज आणि गैरसमज…

महाराष्ट्र लेख
Spread the love

घटना काल पर्वाची आहे. कुणी तरी वयोवृध्द आजारी व्यक्ती त्याला मिळणारा ऑक्सिजन बेड आपल्याहून तरूण असणाऱ्या आजारी माणसासाठी नाकारतो. जर हे खरोखर घडलं असेल तर कौतुक करावे, जर घडलं नसेल तर inspirational story म्हणून सोडून द्यावं. पण तीच व्यक्ती संघाची स्वयंसेवक असणं, हा योगायोग म्हणून देखील सोडून देण्याची दानत समाज माध्यमांवर व्यक्त होणा-या लोकांची नसावी हे हास्यास्पद आहे. खरं तर असा व्यवहारी आणि तरीही आदर्श असा निर्णय घेणारी व्यक्ती डाव्या विचारांची, किंवा कोणत्याही धर्माची, जातीची असली तरी आदर्श ठरते. त्यांच्या भोवतीची माणसं देखील मोठ्या मनाची मानली पाहिजेत…..

वास्तविक असं काही लिहावं असं कधीही मनी नव्हतं. पण हा विचार ट्रिगर व्हायला, म्हणलं तर छोटीशी, म्हणालं तर मोठीशी अशी एक घटना आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी आणि पुढे त्यावरील विविध लोकांचे विविध आयामी वक्तव्य आणि त्यातून दिसणारे दृष्टीकोन कारण आहेत. समाजात अत्यंत सामान्य कुवतीचे लोक अतिशय अवैज्ञानिक समज अपसमज आयुष्यभर जोपासत असतात. स्वतः पुढे होऊन खरं खोटं पहाण्याची ताकद नसते, इच्छा नसते, आणि सोडून देण्याच उमदेपण नसतं. असे गुण अंगीकारणे तर दूरच राहिले.

आयुष्य हिच मोलाची शिदोरी

आयुष्याच्या अनुभवातून ही मंडळी काही शिकतच नाहीत. अनेक अपसमज, धारणा घेऊन ही सामान्य माणसं जगत राहतात. डोळ्यांपुढे घडणारं वास्तव, कुठलीतरी झापडं लाऊन ही माणसं मग नाकारत राहतात. त्यामुळे मग आपल्या समाजाचं दांभिक खोटं पुरोगामित्व ठसठशीतपणाने जाणवतं. मग सैनिकांचा पराक्रम नाकारला जातो, मतदान यंत्रांत गफलत दिसते, डोळ्यांसमोर होत असलेलं सेवा कार्य दिसत नाही, घडत असलेलं वास्तव नाकारलं जातं. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
एक गमतीशीर अपसमज आहेत हे आपल्या समाजाचे, थोडे मांडण्याचा प्रयत्न करतो…..
१. शौर्य…. ही वास्तविक कोणत्याही समाजाची जातीची मिरासदारी नाही. सर्व प्रदेशांत शौर्य गाजवणारे अनेक योद्धे होऊन गेले. याला कुठलीच जमात, जात, समाज अपवाद नाही. पण.. काही लोकांचा विश्वास असतो, की शौर्य ची सगळी मक्तेदारी फक्त आपल्याच जातीची, जमातीची.
२. बुध्दिमता… प्रत्येक प्रदेशात, जातीत, समाजात प्रचंड बुध्दिमता असलेले बुद्धी मान होते, आहेत आणि होतील. पण..काही लोकांचा विश्वास असतो की बुध्दिची सगळी मिरासदारी फक्त आपल्याच जातीची, जमातीची प्रदेशाची..
३. त्याग….प्रत्येक प्रदेशात, जातीत, समाजात प्रचंड त्यागी असलेले लोकं होते, आहेत आणि होतील. पण…… काही लोकांचा असा समज असतो की देशासाठी त्याग करण्याची मिरासदारी फक्त आपल्याच जातीची, जमातीची विचारधारेची, प्रदेशाची.
४. द्वेष… प्रत्येक प्रदेशात, जातीत, समाजात टोकाचा द्वेष करणारे लोकं होते, आहेत आणि होतील. पण…… काही लोकांची पक्की खात्री असतो की द्वेष करणारे लोकं फक्त इतर जाती, जमातीची, प्रदेशाची, विचारधारेची असतात. आपण आणि आपल्यात अशी माणसे नाहीत.
५. मूर्ख…..
६. अप्रामाणिक… बेईमान….खोटारडे…. गैरफायदा घेणारे…
७. आळशी….कामचोर…. कंजूस..
८. देशद्रोही…. पळपुटे….. डरपोक….भामटे…
असे किती तरी लोकं आपल्या अवतीभोवती असतात. आपल्या जाती, कुळाची, विचारधारेची असतात. वास्तविक ही सर्व व्यक्ती ची वैशिष्ट्ये असतात, समाजाची, जातीची, प्रदेशाची नसतात. ‘आपल्या डोळ्यातल मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत’, अशी मराठीतली म्हण आहे.

गांभीर्याने विचार करायला शिकणार कधी

आपल्या समाजाची, देशाची अशीच स्थिती आज झालेली आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रादेशिक अस्मिता, वैचारिक एकारलेपण, जातीवाद, भाषिक उन्माद, आपल्याला देश म्हणून, समाज म्हणून सातत्याने विभागत राहतात यांचेही भान समाज नेतृत्व विसरलेले दिसतं.
जातीय, प्रादेशिक अभिनिवेश बाजूला ठेवले पाहिजेत हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक नेतृत्व स्वातंत्र्य मिळाले त्या दिवसापासून विसरलेच आहेत. काही काळ सर्व समावेशकतेचे नाटक चालले. पण पहिल्या पंतप्रधानांनी देखील डॉ. मुंजे यांच्यासारख्या संरक्षण विषयातील अभ्यासु आणि तज्ञ नेत्याला देशांच्या संरक्षण समितीत देखील घेतले नव्हते, याची इथे आठवण आल्याशिवाय राहत नाही.

संस्कार,आदर्श घालून देणाऱ्यांचे वागणे

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या समावेशाचा मुद्दा लाउन धरल्यामुळे नंतर त्यांचा या समितीत नेहरूना समावेश करावा लागला. हे एक उदाहरण आहे. असं कितीतरी बाबतीत, वारंवार घडवले जाते आहे. ज्यांनी संस्कार करायचे, आदर्श घालून द्यायचे तेच असं वागत होते. मग यातुनच एखाद्याचं, एखाद्या प्रदेशाच, एखाद्या समाजाचं जातीच कर्तृत्व नाकारण्याची सामान्य माणसालाही सवय लागते. कोणी काहीही केलं की, विचारधारा, पक्ष, भाषा, समाज, जात पाहूनच प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिला जातो. ही वागणूक मग व्यक्ती आणि समाज यांचा स्थायीभाव होऊन जातो. मग इतरांच अस्तित्व नाकारण्याची सवय लागते. ही सवय देश म्हणून घातक ठरते.

आपआपल्यापरिने सोयीस्कर राजकारण

या देशात वेगळा विचार, त्या विचारांच प्रतिपादन नाकारण्याची सुरवात आणि मानसिकता सर्व प्रथम गांधी युगात कांग्रेसला लागली. डॉ.आंबेडकरांच, त्यांच्या विचारांच, नेतृत्वाचे अस्तित्व नाकारण्याच काम कांग्रेस व तिचे सर्वोच्च नेतृत्व सातत्याने करीत राहिले. या देशाचा मसिहा, सर्वोच्च त्यागी, दीन दुबळ्यांचा तारणहार, महात्मा म्हणजे मीच ही गांधींची मानसिकता याला कारणीभूत होती. समस्त दीनांचा तारणहार, कैवारी तो मीच, ही मानसिकता. यातुनच अनेक नेत्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी डॉ. आंबेडकरांनी व हिंदूत्ववादी नेतृत्वाने वेगळ्या चूली मांडल्या. मग सर्व विचारधारांनी आत्ममग्न राहण्यात धन्यता मानली. याला अपवाद फक्त राममनोहर लोहिया आणि नानाजी देशमुख यांचाच राहीला. मधल्या काळात नरसिंहराव व अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्व अभिनीवेष सोडून राजकारणाचा आदर्श घालून दिला. पण तो तेव्हढाच.
जेव्हा एखादी व्यक्ती, विचार, समाज नाकारला जातो तेंव्हाच तिथे फुटीची बीजं पेरली जातात. व्यक्ती, विचार, किंवा समाज नाकारून आपण सगळ्यांसाठी भविष्यात निर्माण होणाऱ्या संधी दूर लोटत असतो. आज याच जाणिवेकडे सर्व प्रकारचे नेतृत्व दुर्लक्ष करतांना दिसते. अशा वेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ पुढे येण गरजेचे होऊन बसते. पण न्यायालयाने दिलेले निर्णय, केलेली मिमांसा, भाष्य देखील तोडून मोडून मांडण्याचा काळ आलेला आहे. तेव्हा अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी तरी करंटेपणा करू नये. सामान्य लोकांनी या सर्व घटनांकडे पक्षीय, प्रांतीय, भाषीक, जातीय नजरेने पहाणे सोडून देऊन योग्य तो अर्थ लावायला शिकणे ही काळाची गरज ठरते.

डॉ.विवेक राजे (९८८१२४२२२४)

सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे भोसला मिलिटरी कॉलेज, नाशिक

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *