#कौतुकास्पद :रक्तदानासाठी जनकल्याण समिती,समर्थ भारतसोबत सरसावले हजारो पुणेकर : पंधरा दिवसांत बाराशेहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन तर प्लाझ्मा दानातून पंधराशेहून अधिक रूग्णांना जीवदान


पुणे- कोरोना काळात भासत असलेली रक्ताची गरज व राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण पुणे महानगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समिती व समर्थ भारत अभियानातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते आहे. मागील पंधरा दिवसांत विविध आठ भागांमध्ये झालेल्या एकूण २६ रक्तदान शिबिरांमधून १ हजार २४० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. तर प्लाझ्मा दानासाठी होत असलेल्या प्रयत्नांमधून आतापर्यंत सहाशेहून अधिक जणांनी प्लाझ्मा दान केले. त्यातून १ हजार ५०० हून अधिक गंभीर रूग्णांना जीवदान मिळाले आहे.

या रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी पुणे महानगरातील विविध १२ रक्तपेंढींची मोलाची मदत झाली. रक्तदान शिबिरांसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध गणेश मंडळ, मंदिर विश्वस्त मंडळ व त्यांचे कार्येकर्ते, सेवाभावी व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनकल्याण समिती व समर्थ भारतच्या मदतीने शिबिराचे आयोजन केले.

अधिक वाचा  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालाची रयत विद्यार्थी परिषदेकडून होळी

विविध १२ रक्तपेढ्यांच्या सहकार्याने पुण्यातील सेवावस्ती, नागरी वस्तीत आयोजित शिबिरात नागरिकांनी, विशेष करून तरुणांनी तसेच महिलांनी देखील रक्तदानात उस्फुर्तपणे सहभाग घेतला व रक्ताची कमतरता टाळण्यासाठी सहयोग दिला.

एकूण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तज्ज्ञांच्या मते पुढील दोन महिन्यात रक्ताची आणखी गरज भासु शकते, तेव्हा पुणे शहरातील तसेच राज्यातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी विविध संस्था संघटना, मंडळ, सार्वजनीक ट्रस्ट, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या रक्तदानाच्या महाअभियानात सामील‌ व्हावे,असे आवाहन समर्थ भारतचे संयोजक श्री. सचिन भोसले व सहसंयोजक  रवी शिंगणापुरकर यांनी पुणेकरांना केले आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य घालून दिलेले सर्व नियम पाळुन रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे व सर्व नागरिकांनी काळजी घेत या रक्तदान यज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात करण्यात आले आहे.

अधिक वाचा  ऑटीझम डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पदवीदान प्रदान समारंभ

प्लाझ्मा दानातून पंधराशेहून अधिक रूग्णांना जीवदान

काही गंभीर कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा वरदान ठरते आहे. त्याअनुषंगाने कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लाझ्मा दान करावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व समर्थ भारततर्फे संपूर्ण पुणे महानगरात जनजागृती अभियान राबविण्यात येते आहे. कोरोना होवून गेलेल्या रूग्ण नागरिकांशी फोनव्दारे संपर्क करून त्यांना प्लाझ्मा दानासाठी आवाहन करण्यात येते आहे. या प्रयत्नांस प्रतिसाद म्हणून आतापर्यंत सहाशेंहून अधिक जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. या प्लाझ्मा दानातून १ हजार ५०० हून अधिक गंभीर कोरोना रूग्णांना जीवदान मिळाले आहे. कोरोना रूग्णांच्या संपर्कासाठी व आवाहनासाठी तरूण – तरूणी, डॉक्टर, सामाजिक संस्था संघटनां व त्यांचे कार्यकर्त्यांची मोलाची सहकार्य मिळते आहे अशी माहिती देखील जनकल्याण समिती व समर्थ भारततर्फे देण्यात आली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love