पुणे – आपण जगलो तरच पुढे मराठा आरक्षणासाठी लढणार आहोत. त्यामुळे समाजात उद्रेक निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट कोणी करू नये. ज्या उद्रेकच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याचा त्रास होईल,असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. ही वेळ मोर्चे काढायची नाही तर ही वेळ सामान्य माणसे जगवण्याची वेळ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्दबादल ठरवल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका करीत कोरोना असला तरी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी हे वक्तव्य केले आहे.
संभाजीराजे म्हणाले, मराठा आंदोलनाबाबत माझी आजही सामंजस्याची भूमिका आहे. सध्या कोरोना नियंत्रणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. आपण जगलो तरच पुढे मराठा आरक्षणासाठी लढणार आहोत. म्हणून कोणीही, कुठलीही अशी गोष्ट करू नये ज्याने समाजात उद्रेक होईल.
मराठा समाजात देखील संभ्रम अवस्था आहे. नेमके आपण पुढे कसे जायचे, काय करायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यानंतर राजकीय वातावरण खूप तापले आहे. अशा वातावरणात समाजाची भावना ही आपण सांगावी म्हणून मी काल ट्विट केले होते. लवकरच मी माझी भूमिका स्पष्ठ करणार आहे. माझी भूमिका म्हणजे समाजाची भूमिका असणार आहे.
समाजातील अनेक घटक, तसेच अनेक विद्वान यांच्याशी माझी चर्चा होणार आहे. आणि मगच थोड्याच दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराज यांची भूमिका असते आणि नकळत तीच मराठा समाजाची भूमिका असते. असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विविध पक्षातील नेत्यांचे विविध मत समोर येत आहे तसेच त्यांची भूमिका ही समोर येत आहे. बऱ्यापैकी माझा अभ्यास झाला आहे. थोडे दिवस थांबून याबाबत सविस्तर भूमिका मी मांडणार आहे. अनेक पक्षाची जी काही भूमिका समोर येत आहे ते त्यांची भूमिका आहे. ती माझी भूमिका नाही. माझी भूमिका ही समाजाची भूमिका आहे आणि ती मी लवकरात लवकर सांगणार आहे.