पुणे –सोलापूरमधील शिवसेना नेते महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहचले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल, असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. दरम्यान, महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत अजित पवार यांनी पुण्यात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महेश कोठे हे मागील सात-आठ महिन्यांपासून अस्वस्थ होते. वेगळी भूमिका घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये असे ठरलेले आहे की एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत. त्यामुळे महेश कोठे हे मला भेटलेले नाहीत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी याबाबत काही सांगू शकेन, असे पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यावेळीही कोठे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोठे पुन्हा सेनेत सक्रिय झाले होते. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.