पुणे- राज्यात खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. या गोष्टी योग्य वाटत नाही. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू, असंही पयांनी म्हटलं आहे.
ईडीच्या कारवायांबाबत बोलताना विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ येतो, जातो. काळ जाईल तेव्हा सर्व दुरुस्त्या केल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला.
यापूर्वी इतर काही गोष्टींची चर्चा झाली. पण गेल्या काही वर्षात देशातील लोकांना नवीन यंत्रणा माहीत झाली. त्याचं नाव ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही. काल शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आल्या होत्या. त्यांच्या तीन शिक्षण संस्था आहेत. एक इंडस्ट्री आहे. या संस्थांचा व्यवहार 20-25 कोटींच्या आत आहे. त्यांना ईडी त्रास देत आहे. जिथे गैरव्यवहार झाला असेल तिथे चॅरिटी कमिशन आहे. ते शाळा कॉलेजचा व्यवहार पाहतात. राज्य सरकारचं गृहखातं आहे. आपल्याकडे खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे असे ते म्हणाले.
अनिल देशमुखांची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. या देशात महाराष्ट्रात एवढ्या ईडीच्या केसेस वाचल्या का कधी?, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत. विरोधकांना नमवण्यासाठी एक साधन म्हणून ईडीाच वापर केला जात आहे. ठिक आहे. काळ येतो आणि जातो. काळ जाईल तेव्हा त्यात दुरुस्त्या होतील, असं पवार म्हणाले.