आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती: उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)- लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आली आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय अशी प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवीन सरकारच्याबाबत व्यक्त केली.  दरम्यान, शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? या प्रश्नावर उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? असे उत्तर दिले. प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा टोलाही उदयनराजे भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

छत्रपती उदयनराजे भोसले हे आज पुण्यात आले होते. त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष काढला, त्यामुळे प्रत्येकजण शिवसेना आपलीच आहे असं म्हणतोय, मग शिवसेना माझी आहे असं मी पण म्हणायचं का? असं उत्तर दिलं.शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवालही उदयनराजेंनी केला.

लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो वा खासदार निवडून जातात. त्यामुळे हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा महाराष्ट्र आहे, असं उदयनराजे म्हणाले. इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाही. मात्र, जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची आहे, असंही त्यांनी  नमूद केलं.

कोणाला मंत्रिपद द्यावे कोणाला नाही ते देणाऱ्यांनी ठरवावे, मी त्या ठरवणाऱ्यांमध्ये नाही, असे त्यांनी मंत्रिपदाच्या प्रश्नावरून उत्तर देताना सांगितले. मराठा आरक्षणावर नुसतेच पाट्या लावून फिरतात. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनाच जातीयवादी म्हणतात. मी जातपात बघत नाही. शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन? असेही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ‘मी जे सांगतो त्याला अपवाद कुणीच नाही मनांत स्वार्थ बाळगून सत्ता स्थापन करतात. स्वार्थ साध्य झालं की ते वेगळे मार्ग स्वीकारतातच. आता जे एकत्र आले ते कायम सोबत राहणार कारण त्यांचा विचार एक आहे. ज्यांना वाटत माझ्यामुळे मंत्रीपद मिळाल नाही ते संकुचित आहेत मी असल काही करत नाही जे पोटात तेच ओठावर असतं मी ‘ब्रॅाड माईंडेड वागतो’ असं उदयनराजे म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमध्ये आणखी कोणती विकासकामे करता येतील याबाबत चर्चा केल्याचे उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दीपक केसरकर आज पुणे दौरा करून सातारमध्ये जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मुक्काम करून उद्याही ते कोल्हापूरमध्ये असतील. त्यानंतर ते सिंधुदुर्गला रवाना होतील. त्यामुळे मी आज सातारमध्ये नसल्याने आज त्यांची पुण्यात भेट घेतल्याचे उदयनराजे यांनी यावेळी नमूद केले. जागतिक पातळीवर प्रसिद्धि असलेलं महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचं ठिकाण जर कुठलं असेल तर ते महाबळेश्वर आहे. या ठिकाणी वर्षाकाठी जवळपास ५० लाख पर्यटक येतात. त्यात आणखी भर कशी पाडता येतील, आणखी काय उपाययोजना करता येतील. पर्यटनाच्या माध्यामातून लोकांना कसा रोजगार उपलब्ध करता येईल? यावर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *