घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे,‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे,का म्हणाले अजित पवार असे?

राजकारण
Spread the love

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या रोखठोक, स्पष्ट आणि वेळप्रसंगी तामसी स्वभावामुळे जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते कधी मूडमध्ये असतील तर त्यांच्या विनोदी किस्से आणि उदाहरणामुळेही प्रसिद्ध आहेत. आज पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राजकारणात का येऊ नये आणि कुठले करिअर निवडावे यासाठी असेच एक विनोदी उदाहरण दिले आणि एकच हशा पिकला.

अजित पवार म्हणाले, आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितलं तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा… जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जातं. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता. असं क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा. नाहीतर घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे, ‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे, असं अजित पवार म्हणताच हशा पिकला.

कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवं माध्यम स्वीकारलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. माझा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी मी मास्क काढला, नाहीतर तुम्ही म्हणाल या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला सांगतोय, असं अजित पवार म्हणताच विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली.

मला खूप जण भेटतात. कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याचं सांगतात. त्यामुळे मुलांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या वडिलांना विचारा, व्यवसाय करता येईल का? प्रशासकीय सेवेत येता येईल का? याचा विचार करावा, असा कानमंत्र अजित पवारांनी दिला.

 राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय आणि अडकलोय. कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असं अजितदादा हसत म्हणाले. कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे नाव रोशन करा, असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी दिला. चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा, विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात, अशा कोपरखळ्याही अजितदादांनी मारल्या.

पुढाऱ्यांची पोटं पुढे”

मी पहाटे पाच वाजता उठलो आणि तासभर व्यायाम केला. सात वाजता एक उद्घाटन केलं. लोक विचारतात झोपला होता का? काही पुढाऱ्यांचं पोट एवढं पुढे आलंय, काय सांगावं काही कळत नाही. स्टेजवरही काही लोक सुटायला लागले आहेत. तुम्ही म्हणाल तुमच्या मागे बसलेल्यांना सांगा. त्यामुळे मुलांनो व्यायाम करा. बायको आल्यावर काही जण आई वडिलांना विसरुन जातात, असं करू नका. आई वडिलांचा विचार करा, असा मोलाचा सल्लाही अजित पवारांनी दिला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *