राजस्थानच्या आणि कॉँग्रेसच्या राजकारणातील घमासान : कसा वाढला गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ?

राजकारण राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागेवर नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला गेहलोत या दोन्ही पदांवर कायम राहू शकतात अशी  शक्यता व्यक्त केली जात असतानाच नंतर त्यांनी नकार दिला. त्याला कारण होते सध्या ‘भारत जोडो’ यात्रा करीत असलेले राहुल गांधी. त्यांनी उदयपूर येथील काँग्रेस अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाचा त्यांनी संदर्भ देत एका पदावर एकच व्यक्ती असेल असे संकेत दिले. दरम्यान, सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि  त्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आले. त्यावरून राजस्थानच्या आणि कॉँग्रेसच्या राजकारणात पुन्हा एकदा घमासान सुरू झाले आहे.

दरम्यान, अशोक गेहलोत यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सीपी जोशी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी हायकमांडला सुचविल्याचेही समोर आले आहे. गेहलोत पायलट यांना मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात होते. दुसरीकडे, राहुल गांधींकडून संकेत मिळताच सचिन पायलट राजस्थानमध्ये सक्रिय झाले आणि त्यांनी आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या.

रविवारी दुपारपासून गेहलोत गटाचे आमदार सक्रिय झाले. सायंकाळी ५ वाजता सर्व आमदारांना मंत्री शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीला गेहलोत गटाचे सुमारे ६० आमदार पोहोचल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सायंकाळी ७ वाजेची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र गेहलोत गटाचे आमदार पोहोचले नाहीत. धारिवाल हाऊसमधून बाहेर पडलेले आमदार आपले राजीनामे घेऊन सभापती सीपी जोशी यांच्या घरी पोहोचले. यादरम्यान ९२  आमदारांच्या राजीनाम्याची घोषणा समोर आली.

राजकीय घमासानाचे महत्वाचे मुद्दे

अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षपदाचा दावा करण्यापूर्वी शुक्रवारी राजस्थानमध्ये विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. दरम्यान, गेहलोत समर्थक मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी स्पष्टपणे सांगितले होते की अशोक गेहलोत मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष दोन्ही पदे सांभाळतील. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी हीच इच्छा व्यक्त केली आहे. यावरूनच आगामी काळात राजकीय रंग पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गेहलोत आणि जोशी यांच्यातील जवळीक वाढली आहे. अशा परिस्थितीत आपला विश्वासू नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. सीपी जोशी मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा ही काही पहिलीच वेळ नाही. २००८ मध्येही ते मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र निवडणुकीत एका मताने पराभूत झाल्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यानंतर गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीपासून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहे. त्यादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री होण्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. शेवटी हायकमांडने गेहलोत यांना मुख्यमंत्री आणि पायलट यांना उपमुख्यमंत्री बनवले.

सरकार स्थापन झाल्यानंतरही गेहलोत आणि पायलट यांच्यातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला. दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात अनेकदा दिसले. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत गेले. २०२० मध्ये, सरकारच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी, पायलट यांनी  बंड केले आणि आपल्या समर्थक आमदारांसह हरियाणातील मानेसर येथे गेले. अनेक दिवस चाललेल्या राजकीय उलथापालथीमध्ये गेहलोत यांना आपले सरकार वाचवण्यात यश आले होते, मात्र पायलट यांना प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून पायलट हे फक्त आमदार आहेत. आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे, मात्र गेहलोत त्यांच्या विरोधात उभे राहिलेले दिसत आहेत. गेहलोत यांच्यामुळेच पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास आमदारांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.

सचिन पायलटच्या विरोधात उभ्या असलेल्या आमदारांचे म्हणणे आहे की, १८ बंडखोर आमदार वगळता कोणालाही मुख्यमंत्री बनवा. ते त्यांना साथ देतील. अनेक आमदारांनी सभापती सीपी जोशी यांना मुख्यमंत्री केल्यावर पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *