पुणे- आपण परदेशात गेलो असताना भाजपने आमदार सुरेश धस यांना पत्र देऊन राज्याचा दौरा करण्यास सांगितले होते. मला याबाबत नंतर समजलं. परंतु, उसतोड कामगारांच्या संदर्भात सर्व पक्ष एकत्र येतात. लवादावर जे कारखानदार आहेत ते पैसे देणारे कारखानदार ९९ राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे या चळवळीला कधी पक्षीय स्वरूप नव्हतं. भाजपने सुरेश धस यांना पत्र दिल्याने त्याला काही प्रमाणात पक्षीय स्वरूप आले आहे असे सांगत पक्षश्रेष्ठींनी ते ‘इनोसेन्टली’ केलं असावं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यातून त्यांची नाराजी स्पष्ट होत आहे.
राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पंकजा मुंडे भाजपचे आमदार सुरेश धस आदी उपस्थित होते. सुरेश धस यांना अगोदर या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, बैठकीच्या काही तास अगोदर त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असा निरोप देण्यात आला. धस यांनी बाहेर आंदोलन केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना फोन करून बैठकीला बोलावून घेतलं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी सुरेश धस यांच्या रूपाने पक्षातूनच समांतर नेतृत्व तयार करण्याचा घाट घातला जात असल्याचे चर्चा होती. स्वत: पंकज मुंडे यांनीही याबाबत वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज पंकज मुंडे बैठकीला असतानाही धस यांनी येऊन गोंधळ घातल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.
पंकज मुंडे म्हणाल्या, त्यांचे काय चालले मला माहिती नाही. मला बैठकीचे निमंत्रण होते. पवार सह्बांनी स्वत: ही बैठक बोलावून मला निमंत्रण पाठवले. या बैठकीला कोणी यावं कोणी नाही यावं हा विषय ठरलेला आहे. साखर संघ, उसतोड मजूर संघटना, मुकादम संघटना आणि या चळवळीतील काम करणार्यांना निमंत्रित केले जाते. परंतु, मी परदेशात असताना पत्र दिल्याने त्यामुळे त्याला काही प्रमाणात पक्षीय स्वरूप आले आहे.
दरम्यान ,भाजपचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीला न बोलावण्यासाठी मी दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी माझे नाव घेतले असेल असे मला वाटत नाही. मला या बैठकीचे निमंत्रण होते. मी लवादावर नेतृत्व करते. मुकादम आणि उसतोड कामगारांचा माझ्यावर विश्वास आहे. जे निमंत्रणाच्या यादीत होते ते सर्व आतमध्ये होते. बाहेर काय झाल ते माहिती नाही. मी ना साखर संघात संचालक आहे ना सरकारमध्ये नाही त्यामुळे मी अशाप्रकारचा दबाव टाकण्याचे कारण नाही असे त्या म्हणाल्या.