पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक फडणवीसांच्या टीकेला उत्तर देतील. शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलले पाहिजे, तारतम्य पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुण्यात अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून ,राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रापुरते जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचे उत्तर सडेतोडपणे देईल. आमचे वरिष्ठ देशाच्या राजकारणात बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल.
मला राजकीय जीवनात ३० वर्षे झाली. बारामतीकरांनी मला जरी खासदार म्हणून निवडून दिले होते, पण ६ महिन्यात मी परत आलो. दिल्लीला शरद पवार यांना जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. महाराष्ट्रात मी समाधानी आहे. माझे काम चाललेले असल्याचे म्हणत अजित पवारांनी या घडामोडींवर सुरुवातीला बोलणे टाळले.
पंतप्रधानांच्या प्रत्येक बैठकीला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहिले पाहीजे असे नाही
तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या बैठकीस अनुपस्थितीवरून सध्या भाजपकडून सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, प्रत्येक वेळेस बैठक घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहिले पाहिजे, असे नाही. कधी कोणाला अडचण असते, कधी कोण कोरोनामुळे विलगीकरणात असते किंवा आणखी काही कारण असते. त्याबद्दल स्वत: मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे, जे नेहमी मुख्यमंत्र्यासोबत अशा बैठकीस असतात. याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे संबंधित सल्लागार, सचिव अन्य महत्वाची लोक या बैठकीला हजर होते.
मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही, यावरून राजकारण किंवा टीका टिप्पणी करायचं कारण नाही. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे, ते व्यवस्थित सुरु आहे. त्यांच्या टीमचे सहकारी म्हणून आम्ही, तसेच इतर सर्व अधिकारी योग्य काम करत आहेत. टास्क फोर्समधील विख्यात डॉक्टर्स या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्रीदेखील स्वतः दररोज या सर्व घडामोडींचा आढावा घेतात. त्यामुळे यात राजकारण करण्यासारखं काहीच नाही.’
तर मुख्यमंत्री कठोर निर्णय घेतील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिल्याचे दिसून आले. जर राज्यात ७०० मेट्रिक टनापेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली, तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अजित पवार यांनी बोलून दाखवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच कोरोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे घेतात. मंत्री महोदयांनी त्याच्याबाबतची नियमावली जाहीर केलेली आहे. पण रूग्ण संख्या वाढत आहे, बहुतेक जण घरीच थांबून उपचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. परंतु, हे सगळे होत असताना, जर उद्या ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आणि ७०० मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी राज्यात झाली, तर मग मात्र त्या संदर्भात मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे?
राज्यातील निर्बंध आणि नियमावलीवर भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला. पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील’, असं विधान पत्रकारांशी बोलताना केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यानं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी हा उल्लेख जाणीवपूर्वक केला ही अनावधानानं केला, अशी आता कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.