पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, व्यवसायात भरभराट व्हावी आणि पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पती, सासू, सासरे यांनी अघोरी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरे, मांत्रिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पती शिवराज कोरटकर (वय ३६ रा. सदनिका क्र. ९०३ कात्रज आंबेगाव), सासरे राजेंद्र कोरटकर (वय ६४), सासू चित्रालेखा, मांत्रिक मौलाना बाबा जामदार (वय ६२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासरे, सासूला पोलिसांनी अटक केली असून, मांत्रिक अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला व्यावसायिक कात्रज परिसरातील आंबेगाव परिसरात राहायला आहे. त्याचा २०१३ मध्ये तक्रारदार महिलेशी विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा पती, सासू, सासऱ्यांनी छळ सुरू केला. तिला शिवीगाळ करुन मारहाणही करण्यात आली होती. महिलेच्या आई-वडिलांनी हिरेजडीत सोन्याचे दागिने विश्वासाने पतीकडे ठेवण्यास दिले होते तसेच त्यांच्या सदनिकेची कागदपत्रे दिली होती.
या सर्व प्रकारात फिर्यादी महिलेच्या पतीनेदेखील त्याच्या आई वडील आणि मांत्रिक यांच्या संगममताने पत्नीवर अत्याचार करीत तिची फसवणूक केली आहे. तसेच, धक्कादायक बाब म्हणजे घरात तसेच व्यवसायात भरभराटी यावी, घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी व पत्नीवरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्रप्राप्ती होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेऊन सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.
फिर्यादी पत्नी हिला आरोपी पती यांनी कुटुंबासह संगनमत करून पत्नीचे शारीरिक व मानसिक शोषण करून वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीचे आई वडिलांनी लग्नामध्ये दिलेले सोन्याचे हिन्याचे व चांदिचे दागिने पत्नीने पतीकडे विश्वासाने ठेवण्यास दिलेले असताना आरोपी पती यांने त्या दागिन्यांचा परस्पर अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या नावावर असलेल्या फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेवून त्यावर बनावट स्वाक्षरी करुन बँकेकडून ७५ लाख रु कर्ज काढले. फिर्यादीला मारहाण करून सासरवाडीकडून एक ते दोन कोटी रुपये व्यवसायासाठी आणायला लावले. त्याची परतफेडसुद्धा न करता सासरवाडीच्या मंडळींची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.