पुणे :विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराई गुन्हेगार तब्बल 13 वर्षे पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र बनवून राजरोसपणे वावरत आणि त्याचा उपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इम्तियाज इद्रीस मेमन (रा.तिरुपती सोसायटी, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर दंगल, जाळपोळ, खंडणी मागणे असे गुन्हे आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. एवढ्या वर्षे पोलिसांचे बनावट ओळखपत्र वापरुन तो राजरोसपणे कसा फिरत होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वरिष्ठांनी सांगीतल्याप्रमाणे मेमन याची चौकशी केल्यानंतर तो पोलिसांनाही उडवाउडवीचे देउ लागला. त्यानंतर त्यांच्या नावाचे रेकॉर्ड तपसल्यावर त्याच्यावर हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्यात दंगल,जाळपोळ,खंडणी मागणे असे पांच गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी मेमनला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सन 2007 मध्ये त्याने हे बनावट ओळखपत्र बनवले असून त्यावर स्वत:चे नाव,फोटो,आणि जन्मतारीख त्याने टाकली आहे. तब्बल 13 वर्षे तो बनावट ओळखपत्र बनवून पोलिस म्हणून वावरत होता.
दरम्यान, अशाप्रकारे बनावट ओळखपत्र तयार करून आपल्या अवतीभोवती वावरत असेल तर त्याची तात्काळ माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी, संबंधित पोलीस ठाणे अथवा पोलीस नियंत्रण कक्षाशी तत्काळ संपर्क साधावा, त्याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.