पुणे—पती-पत्नीचा सातत्याने होणारा वाद, पतीचा पत्नीवर संशय, झालेले बाळ आपले नाही या पतीच्या आरोपातून विकोपाला गेलेल्या वादामुळे जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते स्वतंत्र राहायलाही लागले. परंतु, कालांतराने पुन्हा एकत्र आले. मात्र, एकत्र राहण्यासाठी बाळाला सोडून देण्याची अट पतीने घातली आणि चक्क बाळाच्या आईवडिलांनी बाळाला चर्चच्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकत्र राहण्यासाठीच या जोडप्याने बाळाला रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याचा अंदाज खडकी पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान बाळाच्या आई- वडिलांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंगळवारी सोनाली अडागळे यांना खडकीतील मेथॉडिस्ट चर्चच्या रस्त्याच्या कडेला दोन महिन्यांचे एक बाळ सापडले. त्यांनी या बाळाची माहिती खडकी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आईवडिलांचा कसून शोध घेतला.
खडकीतील मेथॉडिस्ट चर्चजवळ बाळ सापडल्यानंतर खडकी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याच्या आईवडिलांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. सोशल मीडियावर हा शोध सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्ते निलेश दास यांना व्हॉट्स अँपवर या बालकाचा फोटो ठेवून ‘मिस यू’ असे लिहिल्याचे आढळले. दास यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केल्यावर हे बाळ त्यांच्या बहिणीचे असल्याचे समजले. पण दास यांना खरा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी या व्यक्तीने बाळाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले. परंतु, दास यांनी बाळ जिवंत असल्याचे सांगत त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिली. ज्यावेळी संबंधित व्यक्तीने ससून रुग्णालयात जात बाळ जिवंत आहे का नाही याची खात्री केली. मात्र त्यानंतर ह्या सर्व प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला.