मानसिक आरोग्यासाठी ‘कनेक्टिंग’ महत्वपूर्ण: काय आहेत मानसिक आजाराचे लक्षणं?


जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : १० ऑक्टोबर: काय आहेत मानसिक आजाराचे लक्षणं?

कोरोना काळात वाढलेले कौटुंबिक ताणतणाव… नोकरी-व्यवसायातील अपयश… परिणामी आर्थिक चणचण अन कर्जबाजारीपणा… सोशल साईट्सचा अतिवापर… त्यातून जडावलेले मानसिक आजार… या सगळ्याचा परिपाक म्हणजे उचलण्यात येणारे आत्महत्येचे पाऊल! आत्महत्येच्या या बिकट वाटेवरून बाजूला नेण्यासाठी त्या व्यक्तीशी ‘कनेक्ट’ होणं आणि त्याला समजून घेणं फार महत्वाचं असतं. या तणावग्रस्त लोकांना चांगलं मानसिक आरोग्य मिळावं आणि त्यांना आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करावं, यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’ महत्वाचं काम करत आहे. आज शनिवारी (ता. १०ऑक्टोबर) जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी आठ लाख लोकांचा मृत्यू आत्महत्येमुळे होतो. ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येमुळे मरण पावते. लान्सेट जर्नलच्या २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारतात १५ ते ३९ वर्षे वयोगटातील लोकांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. ही परिस्थिती बदलावी, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी जागृती व्हावी, याकरिता दरवर्षी १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा होतो. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे आवश्यक आहे. मानसिक अनारोग्यामुळे मनात आत्महत्येसारखे विचार येतात. परंतु वेळीच हे विचार रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. याच भावनेतून अर्णवाझ दमानिया यांनी पुणे येथे २००५ साली ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.
‘कनेक्टिंग’ हेल्पलाईन दूरध्वनी संवादाच्या माध्यमातून तणावग्रस्तांचे मन हलके करते. ‘डिस्ट्रेस हेल्पलाईन प्रोग्रॅम’, ‘सुसाईड सर्वाइव्हर सपोर्ट सिस्टीम’, ‘पीअर एज्युकेटर्स प्रोग्रॅम’ आणि ‘अवेअरनेस प्रोग्रॅम’ अशा चार उपक्रमांतून हा संवाद होतो. पुण्यापासून सुरु झालेले हे काम दिल्ली, हरियाणा, औरंगाबाद, नागपूर, हिंगणघाट, पनवेल आदी भागांमध्ये पसरले आहे. ‘कनेक्टिंग ट्रस्ट’चे सीईओ लियान सातारावाला यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. नोकरीच्या ठिकाणी वाढलेल्या ताणतणावाच्या तक्रारी दूर करण्यासाठी ‘कनेक्टिंग’ एक जनजागृती मॉडेल तयार करत आहे. तसेच पुणे पोलीस, ससून जनरल हॉस्पिटल यांच्यासोबत भागीदारीमध्ये ‘सुसाईड सर्वाइव्हर सपोर्ट प्रोग्राम’ राबविला जात आहे. या अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आणि ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे अशांच्या कुटुंबीयांना भावनिक आधार दिला जातो.
‘डिस्ट्रेस हेल्पलाईन प्रोग्रॅम’द्वारे तणावग्रस्त, व्यथित, निराश तसेच आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या व्यक्ती आपली व्यथा फोनवरून सांगतात. संस्थेतील स्वयंसेवक अशा लोकांचे म्हणणे ऐकून घेतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा सल्ला दिला जात नाही. तसेच संबंधित व्यक्तीची माहिती गुप्त राहते. प्रत्येक कॉल अंदाजे ४५ मिनिटे चालतो. लॉकडाऊनच्या काळात दररोज सरासरी सहा फोन कॉल येत आहेत. तर महिन्याला अंदाजे १६० फोन कॉल येत आहेत. यातून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. भावनिक वेदना मोकळी होण्यासाठी प्रयत्न केला जातो. [email protected] या ईमेलवरूनही अशा लोकांना संवाद साधता येतो. लॉकडाऊन कालावधीत दरमहा व्यथा मांडणाऱ्या ईमेलची संख्या १५ ते ४५ अशी होती. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. घरी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सहकारी शिक्षक प्रोग्रॅम राबविला जातो. त्याचबरोबर आत्महत्या उत्तरजीवी समर्थन प्रोग्रॅम, जागरूकता प्रोग्रॅम सुरु आहेत. लॉकडाऊनपासून या समस्या वाढल्या असून, आत्महत्येचा विचार मनात येण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत, असे निदर्शनास येत असल्याचे एक स्वयंसेवक नमूद करतात.
‘कनेक्टिंग ट्रस्ट’सोबत स्वयंसेवक म्हणून आपणही काम करू शकता. स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनी संस्थेच्या ९८२२३०४२२० किंवा ७०३०२३००३३ या क्रमांकावर अथवा   [email protected] या संकेतस्थळावर संपर्क करावा.

अधिक वाचा  एमएचटी-सीईटी परीक्षेत 96.52 टक्के गुण मिळविणाऱ्या यश गालपेल्ली या विद्यार्थ्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

ही आहेत प्रमुख लक्षणेनोकरी गेल्याने नैराश्य – व्यवसायात अपयश, उलाढाल थांबली- कर्जबाजारीपणा, कर्जवसुलीचा तगादा- कौटुंबिक कलह, प्रेमभंग- सोशल साईट्सचा अतिवापर-  एकलकोंडेपणा, संवादाचा अभाव- मन मोकळे करण्याचा पर्याय नाही.


आत्महत्या नको; येथे संपर्क करातणावात असाल, नैराश्य आले असेल, आत्महत्येचा विचार मनात येत असेल, तर एकदा कॉल करा. तुम्हाला आधार द्यायला आम्ही आहोत. ही सर्व सेवा विनामूल्य आहे. आमचे हेल्पलाईन नंबर मोफत आहेत. तेव्हा ९९२२००४३०५, ९९२२००११२२ या क्रमांकावर रोज १२ ते ८ या वेळेत कधीही फोन करा किंवा [email protected] यावर ईमेल करा.
For more details : Viren Rajput : 9637526537

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love