पुणे- देशभक्तीने परिपूर्ण अशा काही काव्यरचना, सावरकरांच्या काही अजरामर कविता, संवाद आणि स्वगतं यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना मातृतूल्य असणा-या, सतीसावित्री सारख्या, त्यांच्या वहिनी, येसूवहिनी यांच्यातील दिर भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलगडून दाखविणारा तसेच येसूवहिनींच्या मनांत त्यांच्या तेजस्वी दीराबद्दल काय भावना होत्या हे विशद करणाऱ्या, ‘मी,,,येसूवाहिनी’ या हृद्य सांगितिक अभिवाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
महाराष्ट्र शासनपर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताहात मी येसुवहिनी या समिधा पुणे प्रस्तुत एक सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम सेवासदन या शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात स्वा.सावरकरांच्या जाज्ज्वल्य देशभक्ती बद्दल असंख्यांच्या, अगणितांच्या मनांत आदर, अभिमान आणि निष्ठा आहे. मात्र खुद्द सावरकरांना कोणाबद्दल आदर वाटत होता, त्यांचे स्फूर्ती स्थान कोणते? …आणि तेच का? या प्रश्नांची उत्तरे जसजशी प्रेक्षकांना मिळत गेली प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाची संकल्पना व गीतगायन संगीता ठोसर यांचे आहे तर संहितालेखन डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी केले असून अभिवाचन वीणा गोखले, संजय गोखले, विनोद पावशे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रधार दिलीप ठोसर हे होते.