पुणे– रंग बरसे भीगे चुनरवाली……. खंडेरायाच्या लग्नाला……. चलाओ ना नैनो से बाण रे ……शांताबाई…… या आणि अशा अनेक गाण्यांवर आज सोळाशे विशेष मुले रंगांच्या आनंदोत्सवात न्हाउन निघाली. निमित्त होते भोई प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग बरसे’ या रंग महोत्सवाचे. यंदा या उपक्रमाचे 28 वे वर्ष होते. शंभर पोती नैसर्गिक व पर्यावरण पूरक रंग, पाण्याचे टँकर आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी खास मुलांसाठी उडवलेले पाण्याचे फवारे , होळीची गाणी, फुलांच्या पाकळ्या आणि रंग यामुळे या मुलांचे आनंदाला पारावर नव्हता. पाण्यात , रंगात मुले बेभान होऊन नाचत होती .
या मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी खा.डॉ.मेधा कुलकर्णी, आ. रवींद्र धंगेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर, राज्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे आणि विशेष म्हणजे भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवताना अपंगत्व आलेले खडकी येथील क्वीन मेरि टेक्निकल इन्स्टिट्यूट चे जवान सुद्धा या छोट्यांबरोबर छोटे होऊन रंग महोत्सवात आनंद लुटत होते . कर्नल (निवृत्त )वसंत बल्लेवार ,सौ बल्लेवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.पराग काळकर ,शिक्षण तज्ञ डॉ. राजेंद्र हिरेमठ ,उद्योजक किशोर बाहेती, कृष्णकुमार गोयल, दादा गुजर ,उल्हास दादा पवार , यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी तसेच साहित्य ,कला ,संस्कृती, पत्रकारिता ,प्रशासन ,पोलीस, लोकप्रतिनिधी सर्वच क्षेत्रातील धुरिणांनी औपचारिकता बाजूला ठेवून या मुलांसोबत रंग लुटताना होळीच्या गाण्यां सोबत नृत्यावर ठेका धरला.
पुणे अग्निशमन दलाचे जवानांनी या मुलांसाठी खास जलवर्षाव केला
या चिमुकल्यांसाठी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने खास शिरखुर्मा बनवण्यात आला होता. 25 संस्थांमधील सोळाशे विशेष मुलं सहभागी यात सहभागी झाली होती. यामध्ये अनाथ मुलांच्या संस्था, मतिमंद मुलांचे संस्था, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या संस्था, देवदासी भगिनींच्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था, तसेच विशेष म्हणजे वृद्धाश्रमातील आजी आजोबा सुद्धा या नातवंडांसोबत नाचत होते.
या विशेष मुलांच्या आयुष्यात आनंदाचे मांगल्याचे उत्साहाचे रंग निर्माण करण्यासाठी गेली 28 वर्षे भोई प्रतिष्ठानचे वतीने हा अनोखा रंग महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी याप्रसंगी दिली.
रास्ता पेठ येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानात हा कार्यक्रम संपन्न झाला.