दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार : अशा असतील लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असून बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे तर दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या काळात होतील. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ दिवस उशिराने घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला आहे. या शिवाय दोन्ही परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा देण्याची वेळ येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी १५ मिनिटे ते अर्धा तासाची वेळही वाढवून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी होणार लेखी परीक्षा

यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावर इयत्ता दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. १०० टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा होणार नाही. म्हणजे यंदा इयत्ता दहावी आणि बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, असं शरद गोसावी यांनी सांगितलं.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अधिकचा वेळ वाढवून दिला आहे. या दोन्ही परीक्षेच्या ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटं अधिक वेळ देण्यात येणार आहे. तसेच ७०, ८० ते १०० गुणांसाठीच्या परीक्षेसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीचे सकाळच्या सत्रातील पेपर दरवर्षी सकाळी ११ वाजता सुरू होतात. यंदा हे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे दिली जातात. ही दहा मिनिटे यंदाही दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष १० वाजून २० मिनिटाने सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात २ वाजून ५० मिनिटाने प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वाढीव वेळेनुसार परीक्षा देऊ शकणार आहेत. कोरोनामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. प्रत्यक्ष शाळेत हजर राहू न शकल्याने गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे ही वेळ वाढवून दिली आहे.

अशी असेल प्रात्यक्षिक परीक्षा

यंदा बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. तसे निकष तज्ज्ञांना विचारून करण्यात आल्याचं गोसावी यांनी सांगितलं. दहावीचे अंतर्गत मूल्यमापण किंवा प्रॅक्टिकल ४० टक्के अभ्यासक्रमावरच असेल.

प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ४० टक्के अभ्यासक्रम केला तरी अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ: परीक्षक त्याच शाळेतील ठेवण्यात येणार आहेत. सुपरवायझर आला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दडपण येऊ शकते. म्हणून बहिस्थ: परीक्षक नेमण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी कोरोनोमुळं मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही असे गोसावी यांनी स्पष्ट केलं.

दहावीची प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३  मार्च या कालावधीत होईल. काही कारणामुळं प्रात्यक्षिक परीक्षा देता आली नाही तर ५ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

स्वत:च्या शाळेतच परीक्षा देता येणार  

कोरोनामुळं या वर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा उपकेंद्र घेण्याचं निश्चीत करण्यात आलं आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो तिथंच परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना तणावाशिवाय परीक्षेला सामोरं जाता येतं. ज्या शाळेत १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतात तिथं जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येईल. नियमित परीक्षा पद्धतीवेळी असतात त्यापेक्षा चार पट केंद्र निश्चित करण्यात आली आहेत, असं शरद गोसावी म्हणाले.

लेखी परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्याला वैद्यकीय त्रास झाल्यास स्वतंत्र कक्षात त्याची व्यवस्था करण्यात येईल. शासकीय आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना बोलवून उपचार केले जातील आणि तिथं त्याला परीक्षा देता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झिक झॅक पद्धतीनं एका वर्गात २५ विद्यार्थी बसतील असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

यंदा मंडळाकडे दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ अर्ज आले आहेत. तर बारावीसाठी १४ लाख ७२ हजार ५६२ अर्ज आल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. आपल्या मंडळाच्या परीक्षेचं स्वरुप हे वस्तूनिष्ठ, लघूत्तरी आणि दिर्घोत्तरी असं असतं. बारावीसाठी आपल्याकडे १५८ विषय असतात. विज्ञान शाखेसाठी ४ माध्यमातून परीक्षा होते. कला आणि वाणिज्यसाठी  ६ माध्यमातून परीक्षा होते. १५८ विषयांसाठी ३५६ प्रश्न पत्रिका असतात. दहावीसाठी ७ विषय आणि ८ माध्यम असतात त्याच्या १५८ प्रश्नपत्रिका असतात असे गोसावी यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *