तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठतेने न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या पद्धतींनी केला जात आहे -डॉ. जयंत नारळीकर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – आपल्या समाजाच्या धारणा एकविसाव्या शतकातही बदललेल्या नाहीत. मोबाईल सारखे उपकरण सर्वत्र सहजतेने हाताळले जाते. मात्र, बहुतांश लोक मोबाईलचा उपयोग सकाळी शुभ दिवस कोणता आहे, हे पाहण्यासाठी करतात. या  तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठतेने न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या पद्धतींनी आजही केला जात आहे. यामुळे निराशा वाटते. पण मी आशावादी आहे. त्यामुळे युवा पिढीवर विश्वास ठेवून आपण वाटचाल करायला हवी. त्यासाठी समाजात विज्ञाननिष्ठा वाढावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही मी हेच मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी स्पष्ट केले. 

नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मराठी साहित्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्रीत करून विज्ञानावादी युगातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

डॉ.नारळीकर म्हणाले, मराठी ही ज्ञानभाषा असली काय किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी वैज्ञानिक दृष्टीकोनातून ही परिभाषा बदलणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मराठीमध्ये होणारे इंग्रजी भाषेचे आक्रमण?आणि त्याचा सहजतेने होणार वापर हे चुकीचे असून सोप्या आणि सुटसुटीत शब्दसंग्रह करून त्यांचा वापर मराठी बोलताना झाला पाहिजे. मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर केला तरच जागतिक भाषेपर्यंत पोहचता येईल, हे सांगताना त्यांनी शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनेही त्याच्या शोध प्रकल्पाचे सिद्धांत  मातृभाषेतूनच (जर्मन) जगासमोर मांडल्याचे छोटेसे उदाहरण देखील डॉ. नारळीकर यांनी दिले.

पूर्वी उच्चभ्रू व्यक्तींमध्ये इंग्रजी शाळांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कल होता. आता मात्र सर्वसामांन्य व्यक्तींमध्ये देखील अशीच संकल्पना रुढ झाली असून हे अत्यंत चुकीचे आहे. विज्ञान, गणितासारख्या विषयांचे ज्ञान हे मातृभाषेतून देणे महत्वाचे आहे. हे केले जात नसल्यानेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोन सोडून अंधश्रद्धा पसरत असल्याचे ते म्हणाले.

मराठी साहित्याच्या माध्यमातून विज्ञान साहित्याचा मराठी भाषेत प्रसार करण्यासाठी छोट्या छोट्या कार्यशाळा घेणे अपेक्षित आहे. यातूनच मोठी चळवळ उभी करून निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींची मते, प्रश्न जाऊन त्यावर अभ्यासकरून मातृभाषेतून विज्ञानवादाकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे; त्यासाठी तरुणांनी मराठी साहित्यात लिहते होऊन व्यक्त झाले तर वैज्ञानिक दृष्टीकोनही वाढेल आणि अंधश्रद्धेवर मात करता येईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *