पुणे–राज्यभर गाजत असणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्या बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, या घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर ( ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज (शनिवार) सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, खोडवेकर यांना येथील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे पोलीसांकडून २०१९-२० चा टीईटी घोटाळा उघडकीस आणण्यात आला आहे. याप्रकरणात आयुक्त तुकाराम सुपे तसेच शिक्षण विभागाचा सल्लागार अभिजीत सावरीकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर काही शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि चैनमधील इतरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे तपास केले जात आहे. त्यादरम्यान, अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा देखील या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल माहिती घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी सावरीकर याच्याकडून पैसे घेतले.
तसेच, अनेक मुलांना पास केल्याचे समोर आले आहे. त्यांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगून ही मुले पास केली आहेत. सुशील यांनी सावकरीकरकडून पैसे घेतले आणि सुपेंना सांगून मुले पास केली आहेत, असे पुणे पोलीसांकडून सांगण्यात आले.
खोडवेकर हे शिक्षण विभागात २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत कार्यरत होते. खोडवेकर यांनी पैसे घेतले असल्याचं तपासांती समोर आलं. त्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली. सायबर विभागाने खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली. खोडवकेर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. खोडवेकर हे सध्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या उपसचिव पदी कार्यरत आहेत.