Sunetra Pawar –राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राज्यातील सर्वात चर्चेचा असणारा बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.
तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात. नेहमी पवारांच्या लेकीला निवडून दिलं. यावेळी सुनेला निवडून द्या. जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पहायला मिळालं.
अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी ‘बाहेरुन आलेले पवार आणि मूळ पवार, या दोन गोष्टी असतात’, अशी प्रतिक्रिया दिली होती. तुम्हाला यावर काय बोलायचं आहे, असं सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आले. यावर सुनेत्रा पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच यावेळी हे ऐकून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?
मतदारसंघातील लोकांमध्ये मोठा उत्साह असून जिथे जाईल तिथे लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवला मदत होते. त्यामुळे दोन्हीकडे एकच सरकार असणे गरजेचे आहे. बारामती मतदारसंघांमध्ये जो विकास झाला आहे, तशाच प्रकारचा विकास इतर तालुक्यांमध्ये देखील घडवायचा आहे. बारामतीमध्ये अनेक कंपन्या आहेत, महिलांना रोजगार मिळाला आहे. तसाच विकास मतदारसंघातील इतर ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे. माझी उमेदवारी ही जनतेची मागणी होती त्यामुळे जिथे जाते तिथे मोठा पाठिंबा मिळतो आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.