पिंपरी(प्रतिनिधी)–जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दहावीमध्ये प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी वरद कोलप (Varad Gholap) व देवेंद्र काशिद (devendra kashid) यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. दहावी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब वरुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजच्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पिंकी मणिकम, हेमाली जगदाळे, अमृता अमोलिक, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
दुसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, तसेच भाषणे केली. पहिलीतील विद्यार्थ्यानी नन्हा मुन्ना राही हे नृत्य, दुसरी व तिसरीतील विद्यार्थिनींनी ये देश है वीर जवानों का, हे नृत्य, तर आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी सलाम इंडिया हे देशभक्तीपर नृत्य सादर केले.
प्रमुख पाहुणे नरेंद्र काशीद यांनी सांगितले, की येथील शिक्षक हे विद्यार्थ्यांचा पाया पक्का करून घेतात. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्यामुळे भविष्यात हेच विद्यार्थी शाळेसोबतच देशाचे नाव उज्ज्वल करतील. विशेष म्हणजे दहावीमध्ये चांगले गुण मिळाल्याने संस्थापक स्व. नानासाहेब शितोळे यांनी आपला सत्कार केला होता आणि आज याच शाळेत मुलाचा सत्कार होत आहे, हा योगायोग आहे.
आरती राव यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत भारताचे भविष्य आणखी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अतुल शितोळे यांनी तिरंगा ध्वज व त्याचे महत्त्व स्पष्ट करीत स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब वरुडे, प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना एकतेचे महत्त्व सांगत एकतेच्या जोरावर भारताला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त केले, असे सांगितले.
शिक्षिका स्वाती तोडकर यांनी सूत्रसंचालन केले.