कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर


पुणे–कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लावणी, सांगीतिक कार्यक्रम तसेच चित्रपट, मालिका निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या अशा हजारो तंत्रज्ञ, कामगारांसारख्या पडद्यामागील कलाकारांचे जगणे लॉकडाउनने मुश्कील झाल्याचे वास्तव आहे. स्पॉटबॉय, सेटिंग बॉय, लाइटमन, ग्रीसमन, साउंड असिस्टंट, साउंड रेकॉर्डीस्ट, कॉश्‍युम असिस्टंट, आर्ट असिस्टंट, मेकअप असिस्टंट, हेअर ड्रेसर यांसारख्या हजारो कष्टकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोनामुळे नाट्यसृष्टीवरही अवकळा पसरली आहे. कलाकारांसोबतच नृत्यकलाकार, तंत्रज्ञ यांच्यावरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक नृत्य कलाकार आणि तंत्रज्ञांनी अन्य मार्गाचा अवलंब करत स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्ददर्शक, आणि तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरू आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी हे सर्व कलाकार आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. त्यातच सुरश्री प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही २०० गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप करत असल्याचे सुरेखा पुणेकर म्हणाल्या. यावेळी बाळासाहेब दाभेकर, अशोक पुणेकर, शिवसंग्राम पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, मनोज पुणेकर उपस्थित होते.    

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात : बारा हजार स्वयंसेवकांचा सहभाग