पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–पुणे जिल्ह्यातील टेमघर, पानशेत, वरसगाव तसेच खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे.  त्यामुळे धरण पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तर पावसाने पवना नदीला पूर आल्याने चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर परिसर पाण्याखाली गेले आहे.

दुसरीकडे भीमशंकर पट्ट्यातही पावसाचे तांडव सुरू आहे. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरले असून, शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.

वरसगाव, खडकवासला, पानशेत आणि   टेमघर धरण परिसरात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून रात्री १८ हजार क्युसेक इतका विसर्ग मुठा नदीत  करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीचे पात्र ओसंडून लागले होते. त्याचवेळी पावसाचा जोर आणखी वाढला तर धरणातून अधिक पाणी सोडावे लागले असते. त्यामुळे पुणे शहरात पुराचा धोका वाढला होता. सुदैवाने रात्रीत पावसाचे  प्रमाण कमी झाल्याने आज सकाळी खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग ४ हजार २६० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील पुराचा धोका सध्या तरी टळला आहे.

गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून १८ हजार ४९१ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे पुणे महापालिकेने  तातडीने नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी मध्यरात्रीनंतर पुणे शहरात आले. त्यामुळे शिवणे नांदेड हा पुल पाण्याखाली बुडाला. तसेच डेक्कन जिमखान्यावरील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला.

नदी पात्रातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. डेक्कन जिमखाना येथे नदीपात्रात अनेक जण आपली वाहने पार्क करतात. रात्री पार्क करुन ठेवलेली काही वाहने या पाण्यामध्ये अडकली होती.

मोसमी पावसाने द्कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्याला सर्वदूर तडाखा दिला. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरश: धिंगाणा घातला असून,कृष्णा व भीमा खोऱ्यातील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

मागच्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांत संततधार पाऊस होत आहे.  पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. मॉन्सूनच्या पावसाने धरण क्षेत्रात यंदा मोठी ओढ दिली होती. त्यामुळे मागच्या आठवड्यात चिंता वाढली होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू होता. मात्र सातारा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण यथातथाच होते. गेल्या दोन ते तीन दिवसांत कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. तर उत्तर पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील तुळशी धरण क्षेत्रात ८९५ मिलीमीटर, राधानगरी ५७६ मिलीमीटर, दुधगंगा ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सांगलीतील वारणावती धरण क्षेत्रात ५६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. साताऱ्यातील कोयना धरण क्षेत्रात ६१० मिलीमीटर, नवजा येथे ७४६ मिलीमीटर, महाबळेश्वर येथे ५९४ मिलीमीटर, धोम बलकवडी धरण येथे ३९९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी परिसरात ५१४ मिलीमीटर, तर मुळशी धरण क्षेत्रात ३३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *