पुणे-रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर स्पुटनिक व्ही लसीमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे.
गेल्या महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण करण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली. मात्र, त्यामुळे लसींचा पुरवठा अपुरा पडू लागला. भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींना देखील मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे ३० कोटी डोस तयार करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) सीईओ कायरिल दिमित्रिएव्ह यानी एएनआयशी बोलताना माहिती दिली आहे. “सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. काही इतर भारतीय उत्पादक देखील उत्पादनासाठी तयार आहेत”, असं ते म्हणाले. मंगळवारी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये यासंदर्भात करार करण्यात आला आहे.
दरम्यान, सिरम इंस्टिट्यूटचे सीइओ आदर पूनावाला यांनी या काराराबाबत आनंद व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात आम्ही लाखो लसींचे डोस बनवण्यास सज्ज आहोत असे सांगतानाच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्व देश आणि संस्थांनी लसीकरणासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.