राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा प्रेमविवाह कसा झाला? दोघांनी घरच्यांना लग्नासाठी कसे पटवले? लग्नात हुंडा म्हणून काय मिळाले?

राजकारण राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली – देशाच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच राष्ट्रपतीसाठी मंगळवारी मतदान झाले आहे. आता 21 जुलैला निकाल लागणार आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार की यशवंत सिन्हा यांच्या रूपाने विरोधक चमत्कार करणार हे या दिवशी ठरेल.मात्र, आकडेवारीवर नजर टाकली तर द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जोरदार मानली जात आहे. मुर्मू दीड लाखांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकू शकतात. अत्यंत गरीब आणि मागासलेल्या कुटुंबातून आलेल्या मुर्मू यांनी त्यांच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत दोन तरुण मुले आणि पती गमावल्याचे दु:ख त्यांच्या वाट्याला आले होते.

मुर्मू यांची जीवन कहाणी ही ऐकण्यासारखी आहे. मुर्मू यांचा प्रेमविवाह आहे. त्यांची त्यांचे पती श्याम चरण यांच्याशी कुठे आणि कशी भेट झाली? दोघांचं लग्न कसं झालं? दोघांनी घरच्यांना लग्नासाठी कसे पटवले? लग्नात हुंडा म्हणून काय मिळाले? याबाबत आपण जाऊन घेऊ या.

प्रथम जाणून घेऊ या मुर्मू यांच्या बद्दल

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात झाला. मुर्मू संथाल आदिवासी कुटुंबातून येतात त्यांच्या वडिलांचे नाव बिरंची नारायण टुडू होते. ते शेतकरी होते. द्रौपदी मुर्मू यांचा  विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला होता. दोघांना चार मुले होती. यामध्ये दोन मुलगे आणि दोन मुलींचा समावेश होता. 1984 मध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. यानंतर 2009 मध्ये एक आणि 2013 मध्ये आणखी एका मुलाचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला. मुर्मू यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचेही 2014 मध्ये निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येते. आता त्यांच्या कुटुंबात एकुलती एक मुलगी आहे जिचे नाव इतिश्री आहे.

कॉलेजमध्ये शिकतानाच झाले प्रेम

मुर्मू यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. 1969 ते 1973 पर्यंत त्यांनी आदिवासी निवासी शाळेत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी भुवनेश्वरच्या रामा देवी महिला महाविद्यालयात पदवीधर होण्यासाठी प्रवेश घेतला. पदवीधरचे शिक्षण घेण्यासाठी भुवनेश्वरला जाणारी मुर्मू या त्यांच्या गावातील पहिली मुलगी होती.कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची भेट श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाली. दोघांची भेट वाढली, मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. श्याम चरण हेही त्यावेळी भुवनेश्वरमधील महाविद्यालयातून शिकत होते.

श्याम चरण लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले द्रौपदी यांच्या घरी

गोष्ट आहे 1980 च्या दशकातील. द्रौपदी आणि श्याम चरण दोघेही एकमेकांना आवडू लागले. दोघांनाही पुढचं आयुष्य एकत्र जगायचं होतं. कुटुंबाच्या संमतीसाठी श्याम चरण लग्नाचा प्रस्ताव घेऊन द्रौपदीच्या घरी पोहोचले. द्रौपदीच्या गावात श्याम चरण यांचे काही नातेवाईक राहत होते. अशा परिस्थितीत लग्नाची बोलणी करण्यासाठी श्याम चरण आपल्या काका आणि नातेवाईकांसह द्रौपदीच्या घरी गेले. सर्व प्रयत्न करूनही द्रौपदीचे वडील बिरांची नारायण टुडू यांनी हे नाते नाकारले. मात्र, श्याम चरणही मागे हटणार नव्हते. त्यांनी ठरवले होते की लग्न करायचे तर ते द्रौपदी यांच्या सोबतच करायचे. द्रौपदी यांनीही घरात स्पष्टपणे सांगितले होते की त्या श्याम चरण यांच्याशीच लग्न करणार आहेत. श्याम चरण यांनी तीन दिवस द्रौपदी यांच्या गावात तळ ठोकला. अखेर द्रौपदीच्या वडिलांनी या नात्याला मान्यता दिली.

हुंड्यात मिळाले गाय, बैल आणि 16 कपड्यांचे जोड

द्रौपदी यांच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला होता. आता श्याम चरण आणि द्रौपदी यांच्या कुटुंबीयांमध्ये हुंड्याबाबत चर्चा झाली. श्यामचरण यांच्या घरातून एक गाय, एक बैल आणि 16 जोड कपडे द्रौपदी यांना हुंडा म्हणून देण्याचे ठरले. दोघांच्याही कुटुंबीयांनी हे मान्य केले. ज्या संथाल समाजातून द्रौपदी येतात तिथे मुलाच्या वतीने मुलीच्या कुटुंबीयांना हुंडा दिला जातो.

काही दिवसांनी द्रौपदी यांचे लग्न श्याम यांच्याशी झाले. असं म्हणतात की द्रौपदी आणि श्याम यांच्या लग्नात लाल-पिवळ्या देशी कोंबडीची मेजवानी होती. त्यावेळी लग्नात जवळपास सगळीकडे हीच मेजवानी असायची.

सासरच्या घरी नवऱ्याच्या नावाने शाळा उघडली

द्रौपदी मुर्मू यांचे सासर पहाडपूर गावात आहेत. येथे त्यांनी आपल्या घराचे शाळेत रूपांतर केले आहे. श्याम लक्ष्मण शिपुन उच्च प्राथमिक शाळा असे या शाळेचे नाव आहे. ऑगस्ट 2016 मध्ये द्रौपदी यांनी त्यांच्या  घराचे शाळेत रूपांतर केले. दरवर्षी द्रौपदी त्यांच्या मुलांच्या आणि पतीच्या पुण्यतिथीला येथे हमखास येतात.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *