समाजसुधारक संत गाडगे बाबा

महाराष्ट्र लेख
Spread the love

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले कर्मयोगी म्हणजेच संत गाडगे बाबा ! गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक किर्तनकार ,संत आणि समाजसुधारक होते.

संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८९६मध्ये कोतेगांव (शेणगांव, जि. अमरावती) येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नांव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट (धोबी) होते. त्यांच्या आईचे नांव सखुबाई होते. त्यांचे वडील मुळचे खूप श्रीमंत. त्यांची संपत्ती बघून नातेवाईक लोक त्यांचे भवती गोळा झाले. त्यांनी देवधर्माच्या नावाखाली झिंगराजीला दारूचे व्यसन लावले. व्यसनात सगळी संपत्ती हा हा म्हणता संपली. रोजच्या अन्नाची भ्रांत पडू लागल्यावर झिंगराजीने आपले शेणगांव सोडले व आपल्या मावसभावांकडे कोतेगांवी रहायला गेला. तेथेच त्याला एक मुलगा झाला. त्याचे नांव डेबू जे पुढे गाडगेबाबा या नावाने प्रसिद्धिस आले.

झिंगराजीच्या मृत्युनंतर सखुबाई आपल्या माहेरी मुर्तिजापूर तालुक्‍यातील दापुरे या गांवी आल्या. त्यांचे वडिल हंबीरराव व भाऊ चंद्रभानजी. मामाची मोठी शेतजमीन, जनावरे होती. आपल्या आजोळी आल्यावर गुरे राखण्याचे काम डेबुजीने स्वतःकडे घेतले. सुरवातीपासून डेबुजीला कामाची आवड. आपला भाचा आळशी नाही हे पाहून मामाला आनंद झाला. लहानपणापासून गुरे राखणे, शेतीवाडी करणे, नांगर चालविणे अशी कामे डेबुजी करत असे.

याच काळात डेबुजीला भजनाचे वेड लागले. कानावर येणारे अभंग तो पाठ करू लागला. यात त्याचे मित्रही साथ देऊ लागले. रानातल्या या गुराख्यांचे भजनी मंडळ स्थापन झाले. रानमळ्यात मित्रांबरोबर गुरे राखतांना, पोहायला येत नसतांनाही डेबुजीने पुर्णा नदीच्या पात्रात उडी मारली. सुदैवाने या जीवावरच्या प्रसंगातून तो वाचला पण पुढे मोठ्या ईर्शेने तो पोहायला शिकला.

अन्यायाविरूद्ध लढणे हा डेबुजीचा पिंड होता. आपल्या मामाने दोन एकर जमीन गहाण ठेऊन सावकाराकडुन घेतलेले कर्ज अत्यंत मेहनतीने उत्तम पिके घेऊन डेबुजीने फेडले. परंतु सावकार हे मानण्यास तयार नव्हता. तो आपला लवाजमा घेउन डेबुजीच्या शेतात घुसला. डेबुजीने सावकाराच्या माणसांशी दोन हात करून सावकाराला पळवून लावले. व आपल्या मामाची शेती सावकाराच्या ताब्यात जाण्यापासून वाचविली.

डेबुजींचे लग्न १८९२मध्ये झाले. त्यांना चार मुली झाल्या. पहिल्या मुलीच्या बारशाच्या वेळी प्रथेप्रमाणे पंचक्रोषीतील सारे सगे-सोयरे जमले होते. पंगत बसली होती. अशा प्रसंगी बोकडाचे मांस आणि दारू ही पक्वान्ने असत. वाढप सुरू झाले. सगळे पदार्थ वाढून झाले. लाडू वाढले . सर्वांना जेवण्यास सुरवात करण्याची विनंती केली. परंतु कंदुरी (बोकडाचे मांस) व दारू नाही म्हणून जेवण्यास कोणीही तयार होईना. परंतु डेबुजींनी सर्वांना समजून सांगितले हे  आपल्या धर्मात कोठेही सांगितले नाही हे पटवून दिले. दारू पिल्याने आपले व पोराबाळांचे कसे हाल होतात हे सांगितले.  मांस खातांना आपण मुक्‍या जनावराचा जीव घेतो. ते जनावर आपल्या पोराबाळांना कसा आशीर्वाद देईल असे विचारले. डेबुजींचे हे म्हणणे सर्वांना पटले व सर्वजण जेवावयास बसले. समाज परिवर्तनाच्या कार्यातील आयुष्यातील त्यांचे हे पहिले पाऊल होते.

आपल्या संसारात डेबुजींचे मन फारसे रमले नाही. ते घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार करण्यासाठी घराबाहेर पडले. घरच्यांनी त्यांचा खूप शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. घर सोडल्यावर डेबुजी सतत विविध ठिकाणी फिरत होते. त्यांनी बारा वर्षे समाजाचे निरिक्षण केले. या हिंडण्याचा मुख्य उद्देष होता शड्रिपू मारण्याचा! त्यांनी अनेक हाल सहन केले. अंधार असो, उजेड असो, डोंगर असो, दरी असो, रान असो वा माणसांची वस्ती असो, थंडी, ऊन, वारा, पाउस यात डेबुजींची अखंड भ्रमंती सुरू होती. या भ्रमंतीच्या काळात डेबुजी भीक मागून मिळेल ते खात असत. अंगावर फाटके तुटके, चिंध्या झालेले वस्त्र असे. समोर उभ्या असलेल्या संकटांशी सामना करत त्यांची भ्रमंती सुरू होती.

काही वेळा डेबुजी स्वतःहून संकटे निर्माण करत असत. तहान लागली की एखाद्या विहिरीवर जावे, हातपाय धुवून ओंजळीने पाणी प्यावे. विहिरीतून बाहेर आल्यावर आजूबाजूस असणाऱ्या मंडळींना विचारत आम्हा महारांची हीच विहिर का? महार आपल्या विहिरीत उतरला म्हटले की लोक दगड धोंडे मारित अन तो सहन करित डेबुजी तेथून पसार होत. या भ्रमंतीच्या काळातही डेबुजींची परोपकारी वृत्ती सुटली नाही. कोणाच्या शेतात नांगर धरावे, तर कोणाच्या शेतात कापणीस मदत करावी, कोण्या घरची लाकडे फोडून द्यावी तर एखादी बाई ओझे घेऊन चालली असेल तर तिच्या डोक्‍यावरचे ओझे स्वतः घेऊन तिला गावापर्यंत पोहचवावे. या परोपकारी वृत्तीमुळे लोक डेबुजींना देव मानू लागले. डोक्‍यावर वाढलेले केस, अंगावर फाटके कपडे, हातात खराटा अन बगलेत गाडगे अशा वेशामुळे कोणी त्यांना गाडगेबुवा ,कोणी चिंधेबुवा तर कोणी लोटके महाराज म्हणून ओळखू लागले.

या भ्रमंतीच्या काळात गाडगेबाबांनी खेडेन्‌खेडे हिंडून पालथे घातले. मठ थाटून त्यांनी कोठे मुक्‍काम केला नाही. ‘गंगा बहती भली और साधू चलता भला’  या विचाराने ते फिरत राहिले. संपूर्ण दिवसभर एखाद्या गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्या बदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरिता किर्तन करायचे, त्यातून समाज प्रबोधन करायचे. समाज कल्याणाचा प्रसार प्रचार करायचा. सामाजिक प्रबोधनातून लोकांच्या मनांत ज्या अंधश्रद्धा घर करून बसलेल्या आहेत, ज्या अनिष्ट प्रथा (बोकड कापणे, कोंबड कापून देवाला वाहणे) लोकांच्या मनातून उदाहरण देऊन गाडगेबाबा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत. गांवकरी त्यांना गोळा करून जे पैसे देत असत त्याचा उपयोग गाडगेबाबा गावाच्या विकासाकरिताच करत. गावातून मिळालेल्या पैशांतून गाडगे महाराजांनी अनेक शाळा, धर्मशाळा, रूग्णालय आणि जनावरांकरीता गोशाळा देखील उभारल्या. समाजात चालत असलेल्या जातिभेद आणि वर्णभेदाला संपविण्याकरिता त्यांनी खूप प्रयत्न केले.

समाजात दारूबंदी होण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. गाडगे महाराज लोकांना कठोर परिश्रम, सामान्य राहणीमान आणि परोपकार याला अंगिकरणाचे धडे देत. संत गाडगे महाराजांनी लोकांना दशसुत्री संदेश  दिला –

१) भुकेलेल्यांना – अन्न

२) तहानलेल्यांना -पाणी

३) उघडया नागड्यांना -वस्त्र.

४) गरीब मुलामुलींना – शिक्षणाकरिता मदत.

५) बेघरांना – आसरा.

६) अंध – अपंग रोग्यांना-औषधोपचार.

७) बेरोजगारांना – रोजगार.

८) पशुपक्षी मुक्‍या प्राण्यांना – अभय.

९) गरीब तरूण-तरूणींचे – लग्न.

१०) गोरगरिबांना – शिक्षण

संत गाडगेबाबांच्या या कार्याचा गौरव महाराष्ट्र व भारत सरकारने त्याच्या नांवे अनेक पुरस्कार देऊन केला. त्यांना महाराष्ट्र सरकारने त्यांच्या वृद्धापकाळात फिरण्याकरिता एक वाहन दिले. त्यांनी उभारलेल्या अनेक धर्मशाळांवर विश्वस्त म्हणून घरातील कोणासही स्थान दिले नाही एव्हढे त्यांचे जीवन निस्वार्थतेने भरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्मपरिवर्तनाच्या वेळी योग्य मार्गदर्शन – भारतीय मातीत उगम पावलेल्या बुद्ध धर्माचीच दिक्षा देण्यास सुचविणे हे त्यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या कार्यातील एक कार्य होय.

बाबांच्या अंतःकरणात सामान्य जनतेबददल जी अपार तळमळ होती, त्या तळमळीने बाबांना स्वस्थ बसू दिले नाही. त्या कष्टामागे समाजसुधारणेची अपेक्षा होती. अजूनही गरीबीत दिवस काढणारा, पिडलेला, गांजलेला दगड धोंड्याला देव मानून देवाची पूजा करणारा, पशुहत्या करणारा, दारूच्या पेल्यात बुडणारा, बहुसंख्य समाज जेव्हा सुधारेल, तेव्हाच बाबांचे स्वप्न पुरे होईल आणि बाबांनी आयुष्यभर केलेल्या श्रमाचे सार्थक होईल.

आपले संपूर्ण आयुष्य समाजाकरिता वेचलेल्या संत संत गाडगेबाबांचे देहावसान दिनांक २० नोव्हेंबर १९५६ मध्ये आपले आवडते भजन ” गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ हे ऐकतच झाले. त्यागमय, समर्पित अशा संत गाडगे महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

अविनाश देशपांडे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *