‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि वरुणराजाच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखीचे पंढरीकडे प्रस्थान!


पुणे (प्रतिनिधी)-“ज्ञानोबा माउली तुकाराम”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” अशा गगनभेदी जयघोषात, टाळ-मृदंगाच्या मंगलमय तालावर आणि डोळ्यांत सावळ्या विठुरायाच्या भेटीची आर्त ओढ घेऊन, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे आज अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.
यंदा इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली होती. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देऊळवाड्यात (मुख्य मंदिरात) मोठी गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच मानकरी, सेवाकरी  आणि वारकऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीत अतिशय शिस्तबद्ध व सुरक्षितपणे हा प्रस्थान सोहळा पार पडला.
नियोजित कार्यक्रमानुसार, दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली.
सर्व विधी आणि परंपरेचे पालन करत, दुपारी ठीक ४ वाजून २ मिनिटांनी तुकोबारायांच्या पालखीने विठ्ठल भेटीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यावेळी वरुणराजाने देखील अखंड हजेरी लावत वारकऱ्यांवर जलाभिषेक केला.सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा, पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल आणि रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. उद्या बुधवारी सकाळी पालखी पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.
पूर परिस्थितीचे सावट आणि प्रशासकीय दक्षता
गेल्या दोन दिवसांपासून देहू आणि पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवित्र इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदीवरील दोन्ही पूल सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने भाविकांना देहूत येण्याची घाई न करण्याचे आवाहन केले होते. याच दक्षता मोहिमेमुळे मंदिरात केवळ मोजक्याच पासधारकांना आणि मानकरी वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही.
पावसाची विश्रांती
 मंगळवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे वारकरी देहूत दाखल झाले होते.
यंदाचे मुख्य आकर्षण: नवा चांदीचा देखणा रथ
या वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी यंदा प्रथमच वापरण्यात येणारा नवीन चांदीचा रथ. सुमारे २६० किलो चांदी आणि १५० घनफूट सागवान लाकडापासून राजस्थानातील सिहोर येथे सुरेशभाई मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य रथ साकारण्यात आला आहे. या देखण्या रथाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
….,.
 ठळक वैशिष्ट्ये
आज देहूत पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
पहाटे ५:०० वा.: श्री महापूजा व शिळामंदिर महापूजा (विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांच्या हस्ते).
पहाटे ५:३० वा.: तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळा जनक समाधी महापूजा.
सकाळी ९:०० ते ११:०० वा.: श्री तुकोबाराय पादुका महापूजा (इनामदार वाडा).
दुपारी १०:०० ते १२:०० वा.: पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काला कीर्तन.
दुपारी २:३० वा.: मुख्य पादुका महापूजा व प्रस्थान सोहळ्याला सुरुवात.
सायंकाळी ५:०० वा.: पालखीची मंदिर आवारात प्रदक्षिणा.
सायंकाळी ६:३० वा.: इनामदार वाड्यात आगमन, मुक्काम आणि समाज आरती.
पुढील प्रवास मार्ग:

आजचा पहिला रात्रीचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. त्यानंतर उद्या सकाळी (८ जुलै २०२६) पालखी आकुर्डीमार्गे पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण  करेल. पुढे हडपसर, लोणी काळभोर, यवत, बारामती, इंदापूर असा प्रवास करत ही पालखी २४ जुलै २०२६ रोजी पंढरपुरात दाखल होईल आणि २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा केला जाईल.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन