पुण्यात मुसळधार पावसाचा हाहाकार: १०४० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, खडकवासला परिसरात ११५ मि.मी. पावसाची नोंद


पुणे: पुणे शहरात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विविध सखल भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने पावले उचलत शहरातील बाधित क्षेत्रातील २६० कुटुंबांमधील एकूण १०४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पुणे महानगरपालिकेच्या ‘आयसीसीसी’ (ICCC) प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेल्या वेदर स्टेशन्सच्या आकडेवारीनुसार, शहरात सरासरी ५३ मि.मी. ते ११५ मि.मी. पर्यंत पावसाची नोंद झाली असून खडकवासला भागात सर्वाधिक ११५.२० मि.मी. पाऊस पडला आहे. सुदैवाने, शहरात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असल्या तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

महापालिकेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मागील २४ तासांत पावसाचा जोर प्रचंड होता. औंध-बाणेर क्षेत्रात १०६.२० मि.मी., कोथरूड-बावधन भागात १०३.६० मि.मी. आणि सिंहगड रोड परिसरात ९०.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून, सद्यस्थितीत खडकवासला धरण ६२.९२ टक्के भरले आहे. त्यापाठोपाठ पवना ५५.०७ टक्के, मुळशी ४७.५७ टक्के, पानशेत ३९.४१ टक्के, वरसगाव ३६.०६ टक्के आणि टेमघर धरण १६.६७ टक्के भरले आहे. सध्या कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

अधिक वाचा  Prashant Jagtap Resignation : पुणे राष्ट्रवादीत खळबळ: शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा तडकाफडकी राजीनामा

पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे स्थलांतर करणे भाग पडले आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर रोड वाघोली क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शांतीनगर व येरवडा येथील पूरबाधित १२५ कुटुंबांना (५०० नागरिक) नानासाहेब परुळेकर शाळा व वि. द. घाटे शाळेत हलवण्यात आले आहे. येरवडा वडगाव शेरी येथील ४५ कुटुंबांना सारथी शाळा व आनंद ऋषी मनपा शाळेत आश्रय देण्यात आला आहे. ढोले पाटील रोड येथील पंचशील नगरमध्ये झाड पडल्याने १० कुटुंबांना समाजमंदिर येथे हलवले असून, औंध येथील आदर्श नगरमधील ५० कुटुंबांना डॉ. राजेंद्र प्रसाद शाळेत हलवण्यात आले आहे. तसेच शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमधील ३० कुटुंबांना नरवीर तानाजी विद्यामंदिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.

अधिक वाचा  चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आयएएस अधिकारी बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता

प्रशासकीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे एकूण ६३ तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक २९ तक्रारी पाणी साचण्याबाबत होत्या. पावसाळी जाळीवर कचरा साचल्याने ड्रेनेज चोकअप होऊन रस्त्यांवर पाणी साचल्याचे समोर आले, जे महापालिका कर्मचाऱ्यांनी कचरा साफ करून निकाली काढले. याशिवाय १८ ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडल्या असून, ४ ठिकाणी सीमाभिंत पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सोमवार पेठ-धनगर गल्ली आणि अशोक चौक-नाना पेठ या भागात वाडे पडल्याच्या घटना घडल्या, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ४००० सफाई कर्मचारी, ५० फवारणी कर्मचारी, ७० स्वच्छता पर्यवेक्षक आणि ५० स्वच्छता निरीक्षकांसह मोठे मनुष्यबळ तैनात केले आहे. या मोहिमेत २० जेसीबी, ३५ जेटटिंग मशिन, २१४ छोटी गाडी, १०० घंटा गाड्या, ७७ पाण्याचे टँकर आणि ६३ डिझेल पंप यांसारख्या आधुनिक साधनसामग्रीचा वापर केला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने, उपअभियंता केदार वझे आणि शाखा अभियंता प्रकाश कोतवाल हे या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत असून मदतीसाठी ०२०-२५५०१२६९ आणि ०२०-२५५०६८०० हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरात एकूण ४९ ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून पोलीस, अग्निशमन दल आणि सिंचन विभागाशी समन्वय राखून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love