महाराष्ट्राला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी दिलेली अनमोल चार नररत्ने म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर,सोपान, मुक्ताबाई होत. प्रायश्चित्त म्हणून आई-वडील दोघेही सोडून गेल्यावर लहान वयात आपल्या तीनही मोठ्या भावंडांची आई झालेली मुक्ता जगाचीही मुक्ताई झाली.
निवृत्ती शिकवणारा निवृत्ती,ज्ञानाचा मार्ग दाखवणारा ज्ञाना, मार्गावरील पायऱ्या म्हणजे सोपान आणि प्रत्यक्ष मुक्ती म्हणजे मुक्ताई होय. अशी मुक्तीची लक्षणे जिच्यात आहेत ती मुक्ताई. प्रसंगी ज्ञानाला सुध्दा ताटीचे अभंग सांगुन त्याचा राग निववते. तपोनिधी वयोवृद्ध चांगदेवाची आठ वर्षांची मुक्ता गुरु होते. 1400वर्षाचे चांगदेव म्हणतात…
॓ मुक्ताई करे लेईले अंजन ॑
चांगदेवांना पासष्टीचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. चांगदेवांना त्यामुळे आत्मरुपाची जाणीव झाली.
निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्यातील संवादरुपाने ज्ञानबोध हा ग्रंथ आहे. हरिपाठात मुक्ताबाई चे अभंग आहेत. ताटीचे अभंगही प्रसिद्ध आहेत. ताटीच्या अभंगातून प्रत्यक्ष ज्ञानास म्हणजे योगी लोकांना त्यांनी मनाची कवाडे उघडण्याविषयी सांगितले आहे. काम, क्रोध,अहंकाररुपी ताटी उघडल्याने मूक्त आनंद मिळतो. असे आध्यात्मिक स्पष्टीकरण दिले.
योगी पावन मनाचा।साहे अपराध जनाचा।
विश्वरागे झाले वन्ही।संती सुखे व्हावे पाणी।
योग्याचा जन्मच मुळी हलाहल पिण्यासाठी झालेला असतो. समाजाला जेव्हा चांगले द्यावयाचे असते तेव्हा विरोध पत्करावा लागतो.
संताची लक्षणे सांगताना मुक्ताई सांगते.
संत तोच जाणा जगी।
दया क्षमा ज्याचे अंगी।
संत व समाज असे एकरुप असतात कि सारे मिळून एकच शरीर होतात. इतके आपलेसे लोकांना करावे. याविषयी मुक्ताई म्हणतात…..
हात आपुला आपणा लागे।
त्याचा खेद करु नये।
जीभ दाताने चाविली।
कोणी बत्तीशी तोडीली।
मन मारुनी उनमन करा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
या अभंगात तर त्यांनी त्यांच्या चारी भावंडांच्या जीवनाचे सार सांगितले आहे.ज्याच्या मनी शुद्ध भाव असेल त्याला देवत्व प्राप्त होते. सारी साधने प्राप्त झाली तर त्याची किंमत नसते. हे सारे समजून वागावे. आई-वडील विरक्त,आपण संन्याशाची मूले आपले सद्गुरू निवृत्ती आणि मग काय शिकवायचे. हा जीव जेथे आहे तेथे राहणार. पण तुम्ही साऱ्या विश्वाला तारणार. तेव्हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
शुध्द ज्याचा भाव झाला। दुरी नाही देव त्याला।
अवघी साधन हातवटी। मोल मिळत नाही हाटी।
अहो आपण तैसे व्हावे।अवघे अनुमानुनी घ्यावे।
लडिवाळ मुक्ताबाई।जीव मुद्यल ठायीचे ठायी।
तुम्ही तरुनी विश्वतारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
छोटी मुक्ताबाई जीवनाचे सार सांगते. या जीवाला त्रास होतो म्हणून आपण रागवतो.पण हे नश्वर आहे. तेव्हा यातुन बाहेर येऊन समाजकल्याणाचा मार्ग जाणुन घ्यावा.
सामान्य लोकांना हरीपाठात नामाचे महत्त्व सांगतात.
नामचि तारकु तरले भवसिंधु।
हरिनाम छंदु मंत्रसार।
मुक्ताई चिंतनी हरिप्रेम पोटी।
सामान्यांना त्यांना झेपेल अशी हरिपाठातुन अभंग निर्मिती,ज्ञानी लोकांसाठी ताटीचे अभंग, तत्वज्ञानाच्या जाणकारांसाठी संवादरुपी ज्ञानबोध,तपस्वी चांगदेवांच्या गुरु,विसोबांना खेचर नाव देणाऱ्या, नामदेवालाही बोध करणाऱ्या मुक्ताई होत. सर्वांचीच आई आहे ज्याला जे आवडेल,पचेल ते वाढुन सर्व मुलांना तृप्त करणारी,मुक्तीचा मार्ग सांगणारी मुक्ताई. भक्तीयोग मार्गातील मुक्ताई म्हणजेच…
मुंगी उडाली आकाशी।तीणे गिळीले सूर्याशी।
गीताग्रजा
डॉ. वैशाली काळे-गलांडे
9420456918