आरएसएस शताब्दी वर्ष: पुण्यात ‘धर्माचार्य परिषद’ संपन्न; ‘पंचपरिवर्तना’तून राष्ट्रउभारणीचा संकल्प

आरएसएस शताब्दी वर्ष धर्माचार्य परिषद पुणे
आरएसएस शताब्दी वर्ष धर्माचार्य परिषद पुणे

पुणे: “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली १०० वर्षे देशामध्ये समाज संघटन, जागृती आणि सेवा कार्यात कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघाच्या कार्याचा परिचय पोहोचणे आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यात संवाद व समन्वय वाढणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘विद्यापीठ भाग’ व ‘धार्मिक श्रेणी संपर्क विभाग’ यांच्या वतीने पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘धर्माचार्य परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ठाकूर बोलत होते. यावेळी त्यांनी संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतानाच, द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजींचा संघाच्या स्थापनेमागील दृष्टिकोन आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी घेतलेली क्रांतीकारी भूमिका मांडली.
कार्यक्रमात ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर प्रभावी प्रबोधन केले. स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि नागरी कर्तव्य या पाच सूत्रांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. समाजपरिवर्तनासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, प्रत्येकाने या पाच घटकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या परिषदेच्या आयोजनात विद्यापीठ भाग संघचालक सुभाष कदम आणि धार्मिक श्रेणी संपर्क प्रमुख दत्ता मारुती सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. या परिषदेला विविध मठांचे धर्माचार्य, वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि परिसरातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परस्परातील स्नेह आणि संवाद वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  सांगली येथे शासन सहभागाने ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार- चंद्रकांतदादा पाटील