संगमनेर -मित्रत्वाचे ऋणानुबंध, गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत दहावीतील वर्गमित्र तब्बल ३८ वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. संगमनेर (जि. अहमदनगर) येथील सह्याद्री विद्यालयातील १९८३ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच पार पडला.
संगमनेर येथील ‘हॉटेल ग्रेप्स’ येथे हे स्नेहमिलन पार पडले. या शाळेचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत असून या माजी विद्यार्थ्यांचा जणू मेळाच भरला होता. माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या शाळेला विसरत नाही. जिथे अभ्यासाचे धडे गिरवून जीवनात यशस्वी झालो ती पवित्र शाळा, तेथील शिक्षक आणि जिवाभावाची मित्रमंडळी यांची पुन्हा एकदा भेट घडवण्याचा हा सोहळा माजी विद्यार्थ्यांनी केला.
हॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. त्यावेळेचे ते शाळेचे मंतरलेले दिवस आठवून पुन:प्रत्ययाचा आनंद प्रत्येक जण घेत होता. भेटल्यानंतर प्रत्येकाने आपली नव्याने ओळख करून दिली. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच सध्या आपल्या आयुष्यात काय चालले आहे हे एकमेकांना सांगताना गप्पा रंगत गेल्या. श्री सुरेश परदेशी या शिक्षकांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेल्या गीतांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कुणी शिक्षक, कुणी इंजिनिअर, कुणी डॉक्टर, कुणी व्यावसायिक, कुणी पत्रकार, कोणी बागायतदार, कोणी गृहिणी अशी विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेल्या या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत तब्बल ३८ वर्षांनंतर गत स्मृतींना उजाळा दिला. तब्बल ३८ वर्षांनी विद्यार्थी व शिक्षक एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दाटून आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. यावेळी श्री रामनाथ कडलग, श्री विश्वासराव खोजे, श्री व्ही. के. साबळे, श्री श्रीपाद घुले, श्री विठ्ठल शेवाळे, श्री सुरेश परदेशी, श्री अशोक धारणकर, श्री माधवराव कर्डिले, श्री विश्वनाथ भुजबळ, श्रीमती कृष्णाबाई कोल्हे, सौ. शांताबाई देशमुख, सौ. शोभा कढणे (कासार) या शिक्षकांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गुलाबाचे पुष्प देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची समयोचित भाषणे झाली. मिलिंद काळपुंड, डॉ. प्रसाद रसाळ, सौ. शोभा वाविकर(बागूल) यांनी आपल्या भाषणात शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच आपल्याला घडविणाऱ्या शिक्षक वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सत्काराला उत्तर देताना शिक्षकवर्गानेही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. श्री रामनाथ कडलग, श्री व्ही. के. साबळे, श्री विठ्ठल शेवाळे, श्री अशोक धारणकर, श्रीमती कृष्णाबाई कोल्हे, सौ. शोभा कढणे (कासार) या शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या आलेल्या अनुभवांचे कथन करत सह्याद्री विद्यालयाच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीमध्ये अशा प्रकारचा स्नेह मेळावा झाला नसल्याचे नमूद केले.
विद्यार्थी स्नेहमेळाव्यात शालेय जीवनानंतर बऱ्याच वर्षांनी समाजातील एक जबाबदार नागरिक या भूमिकेत प्रथमच एकमेकांना भेटणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजय देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन उमेश ढोले यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री संजय देशमुख, श्री अनिल सातपुते, श्री उमेश ढोले, श्री विलास ताजणे, श्री रवींद्र पाबळकर, श्री उत्तम ताम्हाणे, श्री दीपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.