Modiji's meeting today has shocked the opposition

… म्हणून धंगेकरांपेक्षा मोहोळ ठरताय सरस !

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात अद्याप महायूती आणि महाविकास आघाडी अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूने प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क सुरू असून विविध घटकांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. महयुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मागील दोन निवडणुकांमध्ये (2014 आणि 2019) भाजपच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य टिकवणे अथवा त्यामध्ये वाढ करणे हे आव्हान आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोर भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी करून स्वत:च्या पक्षातील मागील दोन निवडणुकीत मिळलेले मताधिक्य टिकवणे हे आव्हान आहे. यामध्ये कोण यशस्वी होतो त्यावरच विजयाची गणिते अवलंबून आहेत. सद्यस्थितीत मोहोळ हे धंगेकरांच्या तुलनेत कितीतरी पटीने सरस असल्याचे चित्र आहे. धंगेकर हे आव्हान कसे पेलतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी 3 लाखांपेक्षा मताधिक्य घेतले आहे. त्यामध्ये कोथरूड,वडगाव शेरी, पर्वती, कसबा विधानसभा मतदार संघांचा मोठा वाटा होता. या चार मतदार संघांमध्ये राज्यांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी, पुणे शहरांतर्गत पक्ष पातळ्यांवरचे राजकारण याचा परिणाम 2024 च्या निवडणुकीत दिसणार आहे. त्याच्यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

शिवसेना फूटीनंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना(ऊबाठा) अशी शिवसेनेच्या मतदानाची विभागणी, कोथरूड विधानसभेत खासदार मेधा कुलकर्णी यांना नाकारण्यात आल्यानंतर भाजपवर ब्राह्मण समाजाची नाराजी, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर लागलेली वर्णी, महाविकास आघाडीतील एकमेकातील समन्वयाचा अभाव, कॉँग्रेस पक्षांतर्गत स्थानिक नेत्यांमध्येच असलेली नाराजी, देश पातळीवरील विकासाचा मुद्दा आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहरासाठी झालेली कामे या सर्व गोष्टींचा होणाऱ्या मतदानावर प्रभाव असणार आहे.

कोथरूड मधून गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला मिळाले. आता मेधा कुलकर्णी या मतदार संघात सक्रिय झाल्या असून त्यांनी कोथरूडमधून मोहोळ यांना 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा विडा उचलला आहे.

शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) झोकून देऊन मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी झाला आहे. दुसरीकडे शिवसेना(ऊबाठा) मात्र अगोदर कसबा विधानसभा आम्हाला द्याल असा शब्द द्या, तरच काम करू या भूमिकेवर अडून बसला आहे. त्यामुळे शिवसेना(ऊबाठा) पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कितपत धंगेकरांचे काम करतात यावरही कसबा पोटनिवडणुकीमध्ये त्यांना मिळालेले मताधिक्य ते लोकसभेत टिकवतात का? हे महत्वाचे ठरणार आहे.

वडगाव शेरीमध्ये 2014 पासून भाजपच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये  वाढ झाली आहे. सुरुवातीला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले माजी शहराध्यक्ष जगदीश ,मुळीक यांची समजूत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्यानंतर ते जोमाने कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी(अजित पवार गट) यावेळी भाजपबरोबर आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे शरद पवार गटात आहेत. त्यामुळे त्यांची ताकद मोहोळांना अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

पर्वतीमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आमदारकी टिकवण्यासाठी आणि येथून विधानसभेसाठी इच्छूक असलेले महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी जोरदार कामाला लागले आहेत. त्याचा फायदा आपसुकच मोहोळ यांना मताधिक्य मिळण्यात होणार आहे. दुसरीकडे पर्वती मतदार संघातील कॉँग्रेसचे स्थानिक नेते आबा बागूल यांनी पक्षाविरोधातच बंड पुकारले आहे तर पर्वती मतदार संघात कॉँग्रेसचा दूसरा तगडा नेता नसल्याने मोहोळ यांना त्याचा फायदा होणार आहे.

पुण्यामध्ये कॉँग्रेसची पारंपरिक मते आहेत.परंतु, त्याचा ठराविक आकडा ठरलेला आहे. आता बदललेली परिस्थिती, कॉँग्रेस पक्षामध्ये असलेली अंतर्गत सुंदोपसुंदी, केंद्र सरकारने पुणे शहरासाठी केलेली कामे. त्यामध्ये मेट्रो, चांदणी चौकातील आणि कर्वे रस्त्यावरील उड्डाण पूल, नदी सुधार प्रकल्पासाठी दिलेला निधी, देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल यासाठी लोहगाव येथील पुणे विमानतळ येथे उभारलेले एकात्मिक टर्मिनल या मोहोळ यांच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. या गोष्टींचाही परिणाम कोण किती मताधिक्य घेते यावर होणार आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *