दहावी -बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर: दहावीचा ३२.६० टक्के तर बारावीचा १८.४१ टक्के निकाल

शिक्षण
Spread the love

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाइन निकाल बुधवारी (दि.२३) दुपारी १ वाजता जाहीर झाला. दहावीचा एकूण निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा एकूण निकाल १८.४१ टक्के लागला आहे. कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर जुलै-ऑगस्टमध्ये होणारी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती.

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली. दहावीसाठी ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ हजार ३९७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३२.६० इतकी आहे. गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात वाढ झाली आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८१२ इतकी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ए.टी.के.टी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

बारावीसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९ हजार २७४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी १८.४१ इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात घट झाली आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर व लेखी परीक्षा दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केली होती. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर व लेखी परीक्षा दि. २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत आयोजित केली होती.

ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी दि.२४ डिसेंबर ते २ जानेवारी व छायाप्रतीसाठी दि. २४ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी/ गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन्हा प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बारावीत कोकण तर दहावीत नागपूर सर्वात कमी

इयत्ता बारावीच्या विभागनिहाय निकालात औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक २७.६३ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल कोकण विभागाचा १४.४२ टक्के लागला आहे. बारावीचा सन २०१८ यावर्षीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २२.६५ टक्के तर सन २०१९ यावर्षीचा निकाल २३.१७ टक्के लागला होता. इयत्ता दहावीच्या विभागनिहाय निकालात औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक ३९.११ टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा २९.५२ टक्के लागला आहे. दहावीचा सन २०१८ यावर्षीचा निकाल २३.६६ टक्के तर सन २०१९ यावर्षीचा निकाल २२.८६ टक्के लागला आहे.

दहावीचा विभागनिहाय निकाल

पुणे : ३०.७६ टक्के

नागपूर : २९.५२ टक्के

औरंगाबाद : ३९.११ टक्के

मुंबई : २९.८८ टक्के

कोल्हापूर : ३०.१७ टक्के

अमरावती : ३२.५३ टक्के

नाशिक : ३७.४२ टक्के

लातूर : ३३.५९ टक्के

कोकण : ३४.५ टक्के

——

 बारावीचा विभागनिहाय निकाल

पुणे : १४.९४ टक्के

नागपूर : १८.६३ टक्के

औरंगाबाद : २७.६३ टक्के

मुंबई : १६.४२ टक्के

कोल्हापूर : १४.८० टक्के

अमरावती : १६.२६ टक्के

नाशिक : २३.६३ टक्के

लातूर : २२.०५ टक्के

कोकण : १४.४२ टक्के

——

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *