अखेर शाळांची आणि कनिष्ठ महाविद्यालयांची घंटा वाजली


पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर लॉकडाउन करावा लागला. तेव्हापासून आतापर्यंत शाळा महाविद्यालये बंदच होती. पुनश्च हरिओम म्हणत राज्य शासनाने नववी ते बारावीच्या वर्गांना २३ नोव्हेंबरपासून परवानगी दिली होती. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुण्यातील शाळा आधी डिसेंबर महिन्यात व त्यानंतर ४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.त्यानुसार आज (दि. ४ जानेवारी)  शहराच्या हद्दीतील महापालिकेच्या नववी-दहावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गांची घंटा सोमवारी वाजली. मात्र, शहरातील जवळपास सर्वच खासगी शाळा अद्याप बंद आहेत. येत्या एक दोन दिवसात या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

 विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांचे लेखी संमतिपत्र बंधनकारक आहे. तर सर्व शिक्षक व शिक्षकेतरांची करोना चाचणी (आरटीपीसीआर) करणेही बंधनकारक आहे. त्याचबरोबर महापालिकेचे पथक या शाळांची पाहाणी करणार आहे. या पथकाने मान्यता दिल्यानंतरच शाळा सुरू करता येणार आहेत.ऑनलाइन शाळा सुरू असल्याने तसेच करोनामुळे पालकांची तयारी नसल्याने संमतिपत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. शिक्षकांची करोना चाचणी दहा दिवसांच्या आतील असणे आवश्यक आहे. अजून काही शिक्षकांची चाचणी प्रलंबित आहे. तसेच त्याचा अहवाल येण्यासाठी एक-दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यातच पालिकेच्या पथकाने येऊन शाळांची पाहाणी केलेली नाही. त्यामुळे सोमवारी खासगी शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत, अशी माहिती शाळांच्या व्यवस्थापनाने दिली.

अधिक वाचा  महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय -शरद पवार

 दरम्यान, शासकीय आदेशानुसार शाळांना सुरक्षित वावराचे निकष, सॅनिटायझर, एक आड एक बसण्याची व्यवस्था आदी तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे पालिकेने मान्यता दिल्यानंतर लगेचच वर्ग सुरू केले जातील, असेही शाळांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.शहरातील महापालिकेच्या नववी ते बारावीच्या सर्व शाळा सोमवारी खुल्या करण्यात आल्या आहेत. करोनासंदर्भातील सर्व नियम पाळून हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. खासगी शाळांची पाहणी येत्या एक दोन दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर शहरातील सर्व शाळा सुूरू होतील, अशी माहिती महापालिकेचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) शिवाजी दौंडकर यांनी दिली.सोमवारी शहरातील महापालिकेच्या सर्व शाळा, राजीव गांधी ई लर्निंग प्रशाला सुरू झाली होती. राजीव गांधी शाळेत गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, रमणबाग, भावे हायस्कूल, बाल शिक्षण मंदिर, जोग प्रशाला, एमआयटी, कटारिया, दामले प्रशाला, परांजपे शाळा आदी शाळांसह बहुतांश खासगी शाळा बंदच राहिल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love