पुणे— माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ब्लॅकमेल करून जमिनी बळकावणे, धमकावणे, खंडणी मागणे अशा विविध आरोपांखाली ‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेला आरोपी रवींद्र बर्हाटे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बर्हाटे याच्या सर्व बाजूंनी फास आवळल्यानंतर तो आज स्वत:हून पोलिसांना शरण आला.
मागील दीड वर्षात खंडणी प्रकरणी रवींद्र बराटे याच्यासह बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, तथाकथित पत्रकार देवेंद्र जैन, सांगलीचे उद्योजक व पत्रकार संजय भोकरे, संजय जमादार, या सर्वांवर पुणे शहरातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांच्या तक्रारी नुसार १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या सर्वावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र यातील मुख्य आरोपी रवींद्र बराटेच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून अनेक पथकाच्या माध्यमातून तपास सुरू होता.रवींद्र बर्हाटे हा आज दुपारी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत स्वत: हून शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रवींद्र बर्हाटे याच्या शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते.
नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर बर्हाटे यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अॅड. सुनिल मोरे यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर आज रवींद्र बर्हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.