पुणे-मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या काही भागांत येत्या 28 डिसेंबरला मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नाताळ व नववर्षाच्या आनंदावरही पावसाचे विरजण पडणार का, याची धास्ती वाढली आहे.
कोकण व गोव्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यातील थंडीचा जोरही सध्या ओसरला असून, अनेक जिल्हय़ांतील किमान तापमानात एक ते दीड अंशांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, हिवाळय़ाच्या या दिवसांत आता पुन्हा पावसाचे मळभ दाटल्याचे दिसत आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि मराठवाडय़ाच्या काही भागात पाऊस बरसणार असून, उत्तर भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे या भागात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील. तर गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला आदी जिह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रत तुरळक पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकणातील हवामान मात्र कोरडे राहील, असा अंदाज आहे. तर 27 डिसेंबरला विदर्भात हलक्मया पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.