पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची मनधरणी करण्यात कॉँग्रेसला यश आले आहे. बाळासाहेब दाभेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतल्याचे दाभेकर यांनी सांगितले.
महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाळासाहेब दाभेकर पक्षावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात रंगलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम लागले आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकर यांनी मंगळवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दाभेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी दाभेकर यांची नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरपासून अप्पा बळवंत चौक मार्गे दुचाकी फेरी देखील काढण्यात आली होती. बाळासाहेब दाभेकर म्हणाले की, माझी अनेकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी निवडणूक लढवण्यावर ठाम होतो. मात्र राहुल गांधींच्या फोननंतर मी तयार झालो. राहुल गांधी यांनी माझी नाराजी दूर केली आहे. आता मी पक्षावर नाराज नाही.
“मी गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत असल्याने पक्षाकडे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून कार्यकर्त्यांच्या पाठबळावर पोटनिवडणुकीत विजयी होईन, असा विश्वास बाळासाहेब दाभेकर यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.”
काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडची जागा शिवसेनेला लढायची होती. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने या जागेचा हट्ट सोडला. तर भाजपने चिंचवड मतदार संघातून अश्विनी जगताप आणि कसबा मतदार संघातून हेमंत रासणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.