पुणे- रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेला ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी, ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होईल.एरंडवणे-पटवर्धनबाग परिसरात हा सेवा प्रकल्प साकारला आहे.
जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत ही माहिती दिली. ‘जनकल्याण सेवा फाउंडेशन’चे संचालक सीए महेश लेले, आणि ‘डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी’चे कोषाध्यक्ष सीए माधव (अभय) माटे हेही या वेळी उपस्थित होते. या तीन संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ची निर्मिती केली आहे. ‘सेवा भवन’ ही वास्तू सात मजली असून एकूण बांधकाम २७ हजार चौरसफुटांचे आहे.
‘सेवा भवन’ या प्रकल्पामध्ये एका मजल्यावर अल्प शुल्कातील डायलेसिस सेंटर चालवले जाणार आहे. अन्य तीन मजल्यांवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अल्प शुल्कातील उत्तम निवास व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था उपलब्ध असेल. एका मजल्यावर रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मार्गदर्शन तसेच माहिती केंद्र चालवले जाणार आहे. इमारतीच्या तळमजल्यावर ‘जनकल्याण समिती’तर्फे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण केंद्र चालवले जाणार आहे. ‘जनकल्याण समिती’च्या तसेच महाराष्ट्रातील अन्य सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येथे अद्ययावत सभागृह तयार करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. साताळकर यांनी दिली.
‘सेवा भवन’चे उद्घाटन शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होईल. कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीजवळ असलेल्या गांधी लॉन येथे हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. मोहनजी भागवत यांचे यावेळी मुख्य भाषण होईल. पुणेकरांनी डॉ. भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. साताळकर यांनी केले. ‘जनकल्याण समिती’च्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणार्या ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशनही डॉ. भागवत यांच्या हस्ते कार्यक्रमात केले जाणार आहे.