जागतिक स्तरावर भारतीय सौम्य संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे गरजेचे : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी- भारत देशाची सौम्य संपदा मोठी आहे. मात्र, त्याच्या क्षमतेची आपल्याला जाणीव नाही. त्याचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे. यातील मसाले, आध्यात्मिक संपदा, सांस्कृतिक, खाद्य संस्कृतीसह थोर महान विभूती आणि वैचारिक भूमिकेमुळे भारत देश ओळखला जातो. आपल्याकडे असलेल्या या सौम्य संपत्तीची जाण ठेवत, त्याचा सन्मान करून आपणही जागतिक स्तरावर या संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे गरजेचे आहे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना  ‘भारताची सौम्य संपदा’ या विषयावर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे बोलत होते. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष कृष्णराव भेगडे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष दीपक शहा, खजिनदार शैलेश शहा, विलास काळोखे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, नंदकुमार शेलार, गणेश खांडगे, संजय साने, निरूपा कानिटकर, संदीप काकडे, युवराज काकडे आदी उपस्थित होते. दरम्यान, यंदाचा इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार सर्पमित्र निलेश गराडे व साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांना डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. सहस्रबुद्धे यांनी भारत हा आज जगातील सर्वात मोठी सौम्य संपदा असलेला देश आहे. सौम्य संपत्तीच्या बाबतीत भारत हा जगातील महासत्ता आहे, हे आजचे वास्तव आहे. आध्यात्मिक लोकशाही असणे हा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. भारत हा ज्ञानावर आधारित समाज आहे. इथे महाकाव्ये रचली गेली, वैचारिक चर्चा झाली. जागतिक साहित्याचा वारसा असलेली महाकाव्ये, रामायण, महाभारत, तसेच नृत्य, नाट्य, संगीत या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्यामुळे आपली ही महाकाव्ये केवळ भारताचाच नव्हे, तर जागतिक साहित्याचा वारसा बनत आहेत. मसाले, पारंपरिक ज्ञान, आयुर्वेद, योग, वैदिक, संस्कृती आहे, भारतीय पदार्थ देखील आहार आणि पौष्टिक घटकांशी संबंधित आहेत, अशाप्रकारे आपल्या देशात एक परिपूर्ण आहारशास्त्र विकसित केल्याचे सहस्त्र सांगितले.

जाज्वल्य देशाभिमान, अस्मिता, संस्कृत भाषा, उपनिषदे, वाद्ये, पेहराव, चित्रपट, गुरू शिष्य परंपरा, चिंतानात्मक गोष्टी या सौम्य संपदाच आहेत. फक्त याची जाणीव होणे गरजेचे आहे. भारत हा भारत म्हणून उभा राहील, तेव्हा विश्वगुरु बनेल. केवळ सरकार करेल, ही अपेक्षा न बाळगता आपापल्या परीने योगदान देणे, ही आपली जबाबदारी आहे, असेही डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले.

सूत्रसंचालन वीणा भेगडे व संदीप भोसले यांनी, तर आभार प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी मानले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *