पुणे : पं. अरविंदकुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलतर्फे ज्येष्ठ तबलावादक पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून प्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, जगविख्यात गायिका आश्विनी भिडे-देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती, ख्यातनाम तबलावादक सुखविंदर सिंह नामधारी, पं. स्वपन चौधरी आणि अनिंदो चटर्जी आदी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव रसिक पुणेकरांना घेता येईल.
या महोत्सवाचा उदघाटन सोहळा येत्या ३ सप्टेंबरला लॉ कॉलेज ऑडिटोरियम, भारती विद्यापीठ प्रांगण(एरंडवणे), कोथरूड येथे पार पडेल. या कार्यक्रमास ज्येष्ठ गायक पं. विकास कशाळकर तसेच भारती विद्यापीठाचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांची विशेष उपस्थिती लाभेल.
बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद यांचे ज्येष्ठ शिष्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या एकल तबला वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यांना देवेंद्र देशपांडे (संवादिनी) साथसंगत करतील. तर पद्मविभूषण पं. राजन-साजन मिश्रा यांच्या शिष्या डॉ. विराज अमर यांच्या गायनाने या उदघाटन समारंभाची सांगता होईल. त्यांना माधव लिमये (संवादिनी), सौरभ गुळवणी (तबला) साथ देतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील देवधर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य स्वरूपात खुला असेल.
पं. किशन महाराज यांच्या विचारधारेनुसार, प्रख्यात कलाकारांसह नवोदित कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देत या महोत्सवातून संधी देण्यात येईल. त्यामुळे वर्षभर चालणारा हा महोत्सव रसिक पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास तालायनतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.