Prashant Jagtap Resignation : पुणे राष्ट्रवादीत खळबळ: शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा तडकाफडकी राजीनामा

Prashant Jagtap Resignation
Prashant Jagtap Resignation

Prashant Jagtap Resignation :  पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी राजकीय खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP – Sharadchandra Pawar) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation – PMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या हालचालींना जगताप यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. हा राजीनामा त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे सुपूर्द केला असून, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेतून जगताप यांना वगळणे त्यांना भोवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अधिक वाचा  #Manoj Jarange Patil: अजित दादांनी मराठा समाजासमोर एकदा यावे; दूध का दूध पाणी का पाणी करू : जरांगे पाटील यांचे आव्हान

या वादाचे मुख्य कारण म्हणजे, महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येऊन लढावे यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून एक समन्वय समिती  गठित करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan), प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade) आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे (Vishal Tambe) यांचा समावेश करण्यात आला, मात्र शहराध्यक्ष असूनही प्रशांत जगताप यांना या प्रक्रियेतून आणि समितीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन अखेर राजीनामा (Resignation) देण्याचा निर्णय घेतला.

प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते की, आगामी निवडणुकीत आमचे उमेदवार केवळ आणि केवळ ‘तुतारी वाजवणारा माणूस’  याच चिन्हावर लढतील आणि ते पुन्हा चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आपल्याला वैयक्तिक आकस, शत्रूत्व किंवा द्वेष नसल्याचे स्पष्ट केले होते. “अजितदादांच्या हाताखाली मी २४ वर्षे काम केले आहे, त्यांनी माझा कधीही अपमान केला नाही,” असे म्हणत त्यांनी आदराची भावना व्यक्त केली असली तरी, दोन प्रभागांच्या ‘ऍडजस्टमेंट’साठी संपूर्ण शहराचे युनिट संपवणे आपल्याला मान्य नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या मते, ही भूमिका केवळ राजकीय नसून ती पुण्यातील सुसंस्कृत आणि पुरोगामी  राजकारणासाठी घेतलेला पवित्रा आहे.

अधिक वाचा  ब्ल्यू व्हेल गेमच्या व्यसनात अडकलेल्या १५  वर्षीय मुलाने जीवन संपवलं : गॅलरीतून जम्प कर, कागदावरील स्केचनं उलगडलं मृत्यूचं गूढ

गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी हडपसर (Hadapsar) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, जिथे त्यांना अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे (Chetan Tupe) यांच्याकडून केवळ सात ते आठ हजार मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. तरीही, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हाच पुणेकरांसाठी सक्षम आणि हवा हवासा वाटणारा पर्याय असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले होते. “ज्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील असे अधिकृतपणे जाहीर होईल, त्या दिवशी मी पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देईन,” असा इशारा त्यांनी दिला होता आणि आता प्रत्यक्ष बोलणी सुरू झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

प्रशांत जगताप आता आपली पुढील राजकीय दिशा काय ठरवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे, तर दुसरीकडे त्यांनी काही काळासाठी राजकारणातून “स्वल्पविराम” घेण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love