पुणे–फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना आणखी एक धक्का बसला आहे. राज्यातील सत्ता बादलानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचा न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयने काही दिवसांपूर्वी फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी शुक्ला यांनीच आम्हाला फोन टॅपिंग करायला लावले होते असे डहाणे यांनी चौकशीच्या दरम्यान खुलासा केला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय नेत्यांचा फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप होता. राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणामध्ये यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. नुकताच न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला आहे. यामुळे आता शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट कशी दिली गेली, यावरुन हिवाळी अधिवेशनात वाद निर्माण झाला आहे.
पुणे सत्र न्यायालयाने फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी चौकशी वेळी रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचं म्हटलं आहे. मार्च २०१६ ते जुलै २०१८ दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते.
रश्मी शूक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असतांना राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांचा समावेश होता. हे प्रकरण राज्यात गाजले होते. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शहर पोलिस तपास करत होते. परंतु, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर आता पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. २०१६ ते २०१८मध्ये हे प्रकरण पुढे आले होते.
दरम्यान, त्यावेळी पुणे पोलिस दलात असलेले उपायुक्त पंकज डहाणे यांनी देखील शुक्ला यांच्यावर आरोप केले आहे. रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचे त्यांनी म्हटले असून मार्च २०१६ ते जुलै २०१८ दरम्यान त्यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग करण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले आहे.