पुण्यातील पवन सिंह यांची ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेसाठी सलग दुसऱ्यांदा ज्युरी म्हणून निवड


पुणे, दि. ९ जुलै, २०२४ : पुण्यातील सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची जुलै महिन्याच्या शेवटी सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय असून यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिलेले एकमेव भारतीय बनल्यानंतर पवन सिंह यांवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) ने पुन्हा एकदा विश्वास दाखविला असून याही वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते आरटीएस (रिझल्ट, टाईमिंग व स्कोअर)चे पंच सदस्य म्हणून काम पाहतील. नेमबाजी या खेळात ऑलिम्पिक खेळांमध्ये काम करणारे पवन सिंह हे एकमेव भारतीय अधिकारी आहे हे विशेष.

अधिक वाचा  खडकवासला धरणात बुडून दोघांचा मृत्यू

लागोपाठ दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करताना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याबद्दल मी नम्रपणे धन्यवाद व्यक्त करतो असे सांगत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पवन सिंह म्हणाले, “नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन या दोघांनी माझ्या कामावर दाखविलेला विश्वास आणि मला दिलेल्या पाठींब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यावर्षी होत असलेले पॅरिस ऑलिम्पिक माझ्यासाठी दोन कारणांनी खास आहे. यापैकी पहिले कारण म्हणजे नेमबाजी पंच म्हणून माझे हे सलग दुसरे ऑलिम्पिक असेल. तर दुसरे कारण म्हणजे आपण या ऑलिम्पिकसाठी नेमबाजांचा सर्वांत मोठा संघ घेऊन सहभागी होत आहोत. या स्पर्धेत आपले २१ नेमबाज २७ पदकांसाठी स्पर्धेत उतरत आहेत. नेमबाजांच्या संख्येचा विचार केल्यास आपल्या खेळाडूंची संख्या ही सर्वाधिक आणि चीनच्या संघानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेली संघ संख्या असेल.”

माझा मित्र आंतरराष्ट्रीय नेमबाज पद्मश्री गगन नारंग यांची देखील भारतीय संघाचे ‘चीफ-डी-मिशन’ अर्थात पथकप्रमुख म्हणून निवड झाली आहे, ही देखील माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असेही पवन सिंह यांनी नमूद केले. एखाद्या स्पर्धेसाठी अशा पद्धतीने एकाच संस्थेतील नेमबाज अर्थात खेळाडू, पंच आणि पथकप्रमुख म्हणून वेगवेगळ्या व्यक्तींना मिळत असलेली संधी खऱ्या अर्थाने विशेष आहे, याकडे पवन सिंह यांनी लक्ष वेधले.

अधिक वाचा  मोदीजींच्या आजच्या सभेने विरोधकांना धडकी भरली आहे - मुरलीधर मोहोळ

गगन नारंग आणि पवन सिंह हे दोघे पुण्यातील ‘गन फॉर ग्लोरी’ (जीएफजी) या नेमबाजी संस्थेचे सह-संस्थापक आहेत. गन फॉर ग्लोरी अकादमीच्या दोन नेमबाज इलावेनिल वेलारिव्हन आणि रमिता या देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाचा भाग असून महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धांमध्ये त्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जीएफजीने आपल्या स्थापनेपासून आजवर एकूण ३३० आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. गेल्या चार वर्षांत जीएफजीच्या पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी १२७ आंतरराष्ट्रीय पदकांवर आपले नाव कोरले असून पदक जिंकण्यामध्ये जीएफजी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्या नेमबाजांच्या संख्येवरून गेल्या काही वर्षांत जीएफजीच्या यशाचा आलेख हा सातत्याने वाढता असल्याचे लक्षात येते. अलीकडेच ऑलिम्पिक निवड चाचण्यांमध्ये जीएफजीच्या सहा नेमबाजांनी विविध श्रेणींमध्ये भागही घेतला होता.

अधिक वाचा  केवळ उत्सवात नव्हे वर्षभर गणपती मनात रहायला हवा -आमदार अश्विनी जगताप

इलावेनिल आणि रमिता या दोघीही निवड चाचण्या जिंकून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. या चाचण्यांदरम्यान दोघांनी देखील उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. शेवटच्या पात्रता फेरीमध्ये रमिताने ६३६.४ गुण नोंदविले तर अंतिम फेरीत इलावेनिलने २५४.३ गुण मिळवीत अनौपचारिक विश्वविक्रम नोंदवला आहे.

एनआरएआयच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक असताना, पवन सिंह यांनी जजेस आणि ज्युरींकरीता अनेक कोर्सेस  हाती घेतले.

यामध्ये २०२३- २४ साली – एकूण प्रशिक्षित प्रशिक्षक/ अधिकारी/ रेफरी आयएसएसएफ – प्रशिक्षक ६५ | आयएसएसएफ – जजेस – ३६एनआरएआय प्रशिक्षक – ८६ | एनआरएआय जजेस – ९२ | एनआरएआय रेफरी – २०

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love