पार्थ पवार यांची नाराजी दूर? अजित पवार यांचा बोलण्यास नकार

राजकारण
Spread the love

पुणे–राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचे कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र, अद्याप पार्थ यांची नाराजी दूर झाली नसल्याचे बोलले जात आहे. पार्थ पेक्षाही त्याचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हे जास्त दुखवल्याचे त्यांच्या मौनावरून दिसते आहे. बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार देत  मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे, असं सांगत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तर शरद पवार हे आज पुण्यात असताना ते संध्याकाळी बारामतीला येतील आणि कुटुंबियांची बैठक होईल अशी शक्यता होती मात्र, शरद पवार पुण्यातूनच मुंबईला रवाना झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाल्यानंतर वाद निवळल्याने शरद पवार पुण्यातून मुंबईकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे.    

दरम्यान, पवार कुटुंबातील तणावाचे वातावरण येत्या दोन दिवसांत निवळेल. पार्थ पवार नाराज होणे हे स्वाभाविक आहे. मात्र, आता ते शांत आहेत. शरद पवार हे त्यांच्या जागेवर योग्य असून पार्थ पवारही त्यांच्या जागेवर योग्य असल्याचे कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पार्थ पवार यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्यावेळी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असल्याने पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहिरपणे फटकारलं होतं. याविषयी शरद पवार म्हणाले की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.

पार्थ यांना यांना जाहीर फटकारल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार असे सर्वजण उपस्थित होते. या संयुक्त चर्चेत पार्थची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केले. अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात ही शनिवारी (१५ ऑगस्ट) रात्री ही बैठक झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी दुपारी पार्थ पवार बारामती त्यांच्या काकू शर्मिला पवार यांच्याकडे आले होते, यावेळी स्नेहभोजन करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी सायंकाळी येथील ‘गोविंदबाग ‘ निवासस्थानी  येणार असल्याचे सांगितले जात होते आणि रविवारी संध्यकाळी पवार कुटुंबियांची बैठक होणार असल्याचे सांगितले जात होते. शरद पवार आज (रविवार) पुण्यात होते. मात्र, ते बारामतीला न जाता पुण्याहून थेट मुंबईला गेले. तर अजित पवार संध्याकाळी बारामातीहून पुण्याला येऊन पुण्याला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणलंय, असं म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्याचं टाळलं.

दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवारांना जाहीररीत्या फटकरल्याने पार्थ तर दुखावला आहेच परंतु त्याहीपेक्षा अजित पवार अधिक दुखावले गेल्याचे बोलले जात आहेत. जाहीररीत्या प्रसारमाध्यमांसमोर फटकरल्याने दुखावलेला पार्थची समजूत काढणे कुटुंबियांना अवघड जात आहे. या प्रकरणामुळे अनेक तर्क वितर्कांना उधान आले आहे.  पार्थ पवार यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, पवार कुटुंबातील मतभेद मिटणार की याला वेगळं वळण मिळणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारले जात आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *